फ्रान्सच्या अभियंत्यांची कमाल – दुचाकीस्वार कोसळल्यास जीन्स अन् जॅकेटच होणार एअरबॅग
भारतातील रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 2019 या वर्षात दर तासाला 6 दुचाकीस्वारांचा दुर्घटनांमध्ये मृत्यू झाला होता. तर रस्ते दुर्घटनांमध्ये होणाऱया मृत्यूंपैकी दुचारीस्वारांची हिस्सेदारी 37 टक्के आहे. ही स्थिती अत्यंत चिंताजनक असून यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. याचनुसार फ्रान्सचे अभियंते मोसेस शाहरिवार यांची एअरबॅग जीन्स दुचाकीस्वारांसाठी आशेचा किरण जागविणारी आहे. त्यांनी तयार केलेली सुपर-स्ट्राँग जीन्स एअरबॅगने युक्त आहे. चालकाने ही जीन्स घातलेली असल्यास तो कोसळल्यावर एअरबॅग कम्प्रेस्ड एअरने भरून जातील. यातून कोसळल्यावर शरीराला कमीत कमी झटका बसतो.
पुन्हा वापर करता येईल अशाप्रकारे एअरबॅगची निर्मिती करण्यात आली आहे. यात वायू भरून ते पुन्हा परिधान केले जाऊ शकते. एअरबॅग जीन्सला युरोपीय महासंघाच्या हेल्थ अँड सेफ्टी स्टँडर्डकडून प्रमाणित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याच्या अनेक क्रश टेस्ट करण्यात आल्या आहेत. 2022 पर्यंत ही विशेष जीन्स बाजारात येण्याची अपेक्षा आहे.
शरीराच्या खालील हिस्स्यासाठी अशाप्रकारची सुरक्षा मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. तर वरील हिस्स्यासाठीही एअरबॅग जॅकेट लवकरच बाजारात आणण्याची तयारी आहे. ऑटोनॉमस इलेक्ट्रॉनिक या कंपनीने अशाप्रकारचे एअरबॅग विकसित केले आहेत. यातील अत्याधुनिक सेन्सर कोसळल्याच्या स्थितीत सक्रीय होऊन एअरबॅग उघडतात.
तर प्रेंच कंपनी इनअँडमोशनने जीपीएस, जाइरोस्कोप आणि एक्सीलेरोमीटरने ‘ब्रेन’ तयार केला आहे. स्मार्टफोनपेक्षा आकाराने काहीसा मोठा असलेला हा बॉक्स पाठीवर परिधान करतो. याचा सेन्सर प्रत्यक्षवेळेत दुचाकीस्वाराची स्थिती प्रति सेकंद 1000 वेळा मोजतो. दुचाकीची एअरबॅग कारच्या एअरबॅगप्रमाणेच चालकाला वाचविते. ही एक क्रांती ठरणार असल्याचे ब्रिटनच्या लाफबरो विद्यापीठाचे वरिष्ठ व्याख्याते रिचर्ड फ्राम्पटन यांनी म्हटले आहे.