कनेडीतून चोरीस गेली होती दुचाकी
कणकवली:
दोन महिन्यांपूर्वी कनेडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथून चोरीस गेलेल्या दुचाकी प्रकरणातील संशयित राजू मुकुंद पाटले (39, सौंदाळे, ता. देवगड) याला कणकवली पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी रत्नागिरी येथून अटक केली. या प्रकरणात हवालदार आर. बी. नानचे यांनी महत्वाची भूमिका बजावली. पाटले याला शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
ही घटना 4 एप्रिलला रात्री आठच्या सुमारास घडली होती. चंद्रशेखर चिंतामणी कुलकर्णी (रा. हरकुळ खुर्द) हे काही सामान आणण्यासाठी कनेडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रानजीकच्या एका घरी गेले होते. त्यावेळी त्यांनी आरोग्य केंद्राजवळ दुचाकी (एमएच-07/वाय-3409) उभी केली होती. अवघ्या 15 मिनिटांनी ते मागे आले, तेव्हा दुचाकी चोरीस गेली होती. याबाबत चंद्रशेखर यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरटय़ाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यानच्या कालावधीत सदरची दुचाकी विजयदुर्ग परिसरात आढळली. चौकशीत दुचाकी राजू पाटले हा वापरत असल्याचे विजयदुर्ग पोलिसांना समजले. आपले चोरीचे बिंग फुटणार या भीतीने पाटले हा विजयदुर्ग परिसरातून पसार झाला. मात्र, पाटले हाच दुचाकीचोर असल्याचे समजल्याने कणकवली पोलिसांनी हवालदार आर. बी. नानचे यांच्य नेतृत्वाखाली त्याला पकडण्याची मोहीम आखली.
पाटले हा सध्या रत्नागिरी येथे असल्याचे समजल्यानंतर नानचे यांच्यासह कॉन्स्टेबल घाडीगावकर यांनी गुरुवारी रत्नागिरी गाठले. सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास त्यांनी पाटले याला रत्नागिरीतून ताब्यात घेतले. पुढे कणकवली पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याने यापूर्वीही चोरीचे गुन्हे केल्याचे स्पष्ट होऊ लागले.
शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी सरकारी पक्षातर्फे ऍड. गजानन तोडकरी यांनी, पाटले याने यापूर्वी केलेल्या चोरीच्या गुन्हय़ांबाबत तपास करणे, त्याचे आणखी काही साथीदार असल्यास त्यांचा शोध घेणे आदी कारणास्तव पोलीस कोठडीची मागणी केली. त्यानुसार न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.