असळज / प्रतिनिधी
गगनबावडा तालुक्यातील असळज येथे दुचाकी व कंटेनर अपघातात दोन शाळकरी मुले गंभीर जखमी झाली आहेत. त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, असळज येथे कुणाल पांडुरंग तोरस्कर (इयत्ता १० वी रा. नरवेली), अक्षय प्रकाश लाड (इयत्ता १० वी रा. नरवेली) हे दोघे एम. एच. ०९ इ.झेड ७१८ या गाडीवरून दहावीच्या परीक्षेचा पेपर संपल्यानंतर आपल्या घरी परतत असताना असळज येथील वळणावर आले. यावेळी कोल्हापूरच्या दिशेने येणाऱ्या कंटेनर एम. एच. १० सी.आर २३४५ याला दुचाकीने जोराची धडक दिल्याने दोघे विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहे. दोघा जखमींपैकी एकाची प्रकृती अतिशय गंभीर आहे. त्याच्या पायाला व शरीराला जोरदार मार लागला आहे. दोघा जखमींना तातडीने खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील अरुण गावकर घटनास्थळी धाव घेतली. अधिक तपास पोलीस कर्मचारी महादेव रेपे, सुशिल गायकवाड तपास करीत आहेत.