-घाटकोपर येथील कंपनीचा कोल्हापुरातील 15 ते 20 जणांना गंडा
प्रतिनिधी/कोल्हापूर
गुंतवणुकीच्या दुप्पट परतावा देण्याच्या अमिषाने घाटकोपर येथील एका कंपनीने कोल्हापुरातील 15 ते 20 गुंतवणुकदारांची 1 कोटी 75 लाखांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी टेक प्रॉफिट कंपनीचे समीर जोशी, सुरेश पवार, जैसन रॉड्रिक, प्रेम चौधरी, अभिजित दुधवडकर (सर्व रा. मुंबई) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद पांडूरंग बाळासाहेब पाटील (वय 39, रा. सादळे (ता. करवीर), सध्या रा. साई मंदीरसमोर, रंकाळा स्टॅंड, कोल्हापूर) यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दिली.
पोलिसांकडून मिळालेली माहीती अशी, टेक प्रॉफिट कंपनीद्वारे एलएक्सएफएक्स लिक्युडीटी ऑफ सोल्यूशन ऍप्लिकेशनमध्ये सभासद होऊन गुंतवणूक केल्यास गुंतवणुकीच्या दुप्पट परतावा देण्याचे अमिष कंपनीच्या वतीने गुंतवणूकदारांना दाखविण्यात आले होते. यावर विश्वास ठेवून सप्टेंबर 2019 ते 20 ऑक्टोबर 2020 या मुदतीत फिर्यादी पांडूरंग पाटील यांच्यासह 15 ते 20 जणांनी संशयित पाचजणांकडे एकूण 18 लाखांची गुंतवणूक केली होती. या गुंतवणुकीची मुदत संपल्यानंतरही संशयितांनी त्याचा फिर्यादांसह साक्षीदारांना मिळणारा 1 कोटी 75 लाख 14 हजार 866 रुपयांचा परतावा दिला नाही. अनेकदा फिर्यांदीने संर्पक साधून परतावा देण्यासंबधी पत्रव्यवहार केला होता. मात्र, त्यांनी व त्यांच्या कंपनीने दाद दिली नाही. त्यामुळे अखेरीस फिर्यादी पाटील यांनी जुना राजवाडा पोलिसांत धाव घेतली. मात्र, हा गुन्हा घाटकोपर (मुंबई) येथे घडल्याने तो जुना राजवाडा पोलिसांनी मुंबई पोलिसांकडे वर्ग केला.