महापालिका, आरोग्य खात्याचे अधिकारी-कर्मचाऱयांवर सोपविण्यात आली जबाबदारी
प्रतिनिधी/ बेळगाव
शहर परिसरात 7 जणांना कोरोनाची लागण झाली असल्याने कोरोनाग्रस्तांची साखळी वाढत चालली आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांच्या दुय्यम संपर्कात आलेल्या 150 नागरिकांची यादी तयार करण्यात आली असून त्यांचा शोध घेण्याची जबाबदारी महापालिका आणि आरोग्य खात्याचे अधिकारी व कर्मचाऱयांवर सोपविण्यात आली आहे. यामुळे सर्वांचा शोध घेण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. त्यामुळे प्रारंभी कोरोनाची लागण झालेले रुग्ण आढळून आले नाहीत. मात्र दिल्ली मरकजहून आलेल्या नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढत गेली असून बेळगाव शहर परिसरात 7 रुग्ण असल्याचे निदर्शनास आले आहे. यापैकी कॅन्टोन्मेंट परिसरात 4, आस्मा कॉलनी, अमननगर आणि आझाद गल्ली येथील प्रत्येकी एक रुग्ण असल्याचे आढळून आले आहे.
रुग्णांच्या थेट संपर्कात असलेल्या बहुतांश नागरिकांना तसेच परिवाराला ताब्यात घेऊन होमक्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच त्यांची तपासणी करण्यात आली आहे. कोरोनाग्रस्त रुग्ण सापडलेल्या परिसरात व परिवाराच्या संपर्कात आलेल्या सेकंड कॉन्टॅक्ट म्हणून घोषित करण्यात आलेल्या 150 नागरिकांची यादी तयार केली आहे. सदर यादी महापालिकेच्या कर्मचाऱयांकडे सोपविण्यात आली असून आरोग्य खाते व महापालिकेच्या कर्मचाऱयांकरवी नागरिकांचा शोध घेण्यात येणार आहे. घरोघरी जावून नागरिकांची माहिती घेण्यात येत आहे. तसेच नागरिकांना तपासणीकरिता पाठविण्यात येत आहे. रुग्णांची संख्या वाढत चालल्याने कोरोनाग्रस्तांची साखळी वाढली आहे.
शहर-उपनगरांमध्ये 4 ठिकाणी कंटेन्मेट झोन सध्या शहर व उपनगरांमध्ये 4 ठिकाणी कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे कंटेन्मेंट झोनसह विविध परिसरातील नागरिकांचा शोध घेण्याची मोहीम हाती घेण्यात आली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.