मॉर्निंग वॉकर्सकडून नाराजी व्यक्त : शिवाजी उद्यान परिसरात पोलीस बंदोबस्त
प्रतिनिधी /बेळगाव
बेंगळूर येथे काही मुठभर माथेफिरूंनी शिवमूर्तीचा अवमान केला होता. त्यामुळे बेळगावमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी छत्रपती शिवाजी उद्यान शनिवारी बंद ठेवण्यात आले होते. रविवारी देखील दिवसभर उद्यान बंद असल्याने मॉर्निंग वॉकर्स तसेच शिवभक्तांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. साप्ताहिक सुटी असल्याने रविवारी आपल्या कुटुंबासह अनेकजण शिवाजी उद्यान परिसरात येत होते. परंतु त्यांना आत सोडले जात नसल्याने हिरमोड झाला.
शिवमूर्तीच्या झालेल्या अवमानाचा उदेक बेळगावमध्ये झाला. यामुळे शुक्रवारी रात्री एकत्रित आलेल्या तरुणांनी शनिवारी सकाळी शिवाजी उद्यान येथून भव्य मोर्चा काढण्याचे ठरविले होते. हे थांबविण्यासाठी पोलिसांनी शहरात जमावबंदीचा आदेश दिला. शनिवारी सकाळपासून मोठय़ा संख्येने युवक शिवाजी उद्यान परिसरात जमा होत होते. बेंगळूर येथील घटनेचा निषेध करत युवकांनी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. यामुळे शिवाजी उद्यान परिसरात गोंधळ उडाला होता. या घटनेचे तीव्र पडसाद उमटू नयेत यासाठी पोलिसांनी शिवाजी उद्यान शिवप्रेमींसाठी बंद केले.
शिवाजी उद्यान येथे दररोज व्यायामासाठी अनेकजण येतात. उद्यान परिसरात मॉर्निंग वॉक करणाऱयांची संख्याही अधिक आहे. परंतु या घटनेमुळे शनिवारी व रविवारीही उद्यान बंद ठेवण्यात आले होते. साप्ताहिक सुटी असल्याने विरंगुळय़ासाठी कुटुंबासमवेत अनेक जण उद्यान परिसरात दाखल झाले होते. परंतु पोलीस बंदोबस्त असल्याने त्यांनाही माघारी फिरावे लागले. काही माथेफिरूंमुळे सर्वांनाच नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. यामुळे शिवप्रेमी तसेच मॉर्निंग वॉकर्सकडून नाराजी व्यक्त होत आहे.
पोलिसांचा बंदोबस्त
बेंगळूर येथे शिवमूर्तीच्या अवमानाची घटना घडल्यानंतर त्याचे पडसाद बेळगावमध्ये उमटले. शिवाजी उद्यान येथील शिवमूर्तीला अभिषेक व पूजन करण्यासाठी बेळगावसह परिसरातील विविध संघटनांचे पदाधिकारी व युवक दाखल होत होते. परंतु पोलिसांकडून त्यांना हटविले जात होते. जमाव एकत्र येऊन कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेण्यात आली होती. मोठा पोलीस फौजफाटा शिवाजी उद्यान परिसरात लावण्यात आला होता. रविवारी दुसऱया दिवशीही या परिसरात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
‘त्या’ घटनेचा सर्वत्र निषेध
शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा माथेफिरूंकडून अवमान करण्यात आला. या घटनेचा सीमाभागासह देशभरातून निषेध केला जात आहे. बेळगावमधील विविध संघटनांनी या घटनेचा निषेध करत संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. देशभरातील विविध मान्यवरांनी या घटनेचा निषेध प्रसार माध्यमांवर केला आहे. युवकांनीही आपल्या वॉट्सऍप, फेसबुकवरून या घटनेचा निषेध करत महाराजांबद्दलचे आपले प्रेम व्यक्त केले आहे.