कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंबा उत्पादकांना दिलासा
प्रशांत वाडेकर / देवगड:
कोरोनामुळे देशात असलेल्या लॉकडाऊनमुळे फळांचा राजा असलेल्या हापूस आंब्याला मोठा फटका बसला आहे. वाशी मार्केटदेखील बंद असल्याने आंबा विक्री ठप्प झाली आहे. अशा परिस्थितीत कृषी पणन महामंडळ आंबा बागायतदारांच्या मदतीला धावून आले आहे. पणन महामंडळाने ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून आंबा थेट ग्राहकापर्यंत उपलब्ध करून दिला आहे. आंब्याची ही देवघेव पोर्टलच्या माध्यमातून उत्पादक व ग्राहक अशा दुहेरी पद्धतीने घेता येणार आहे. आंबा उत्पादकांची व खरेदीदारांची नोंदणी या पोर्टलवर सुरू झाली आहे.
देवगड व रत्नागिरी हापूस आंब्याचा हंगाम सुरू असल्याने मोठय़ा प्रमाणात आंबा तयार झालेला आहे. हापूस आंबा शहरातील ग्राहकांना उपलब्ध व्हावा, यासाठी पणन महामंडळ दरवर्षी आंबा महोत्सव आयोजित करते. मात्र, यावेळी कोरोनाच्या संकटामुळे महोत्सवाचे आयोजन करणे शक्य नाही. तसेच आंबा उत्पादकांचे होत असलेले नुकसान टाळण्यासाठी पणन महामंडळाने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत हापूस आंबा ग्राहकापर्यंत पोहोचविण्यासाठी ऑनलाईन माध्यमाचा वापर केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंबा उत्पादकांना विक्रीसाठी विविध शहरांमध्ये जाणे शक्य नाही व त्यांना जावे लागू नये. तसेच आंबा खरेदीसाठी ग्राहकांना घराबाहेर पडावे लागू नये, यासाठी पणन महामंडळाने ऑनलाईन पोर्टल माध्यमाचा वापर केला आहे. या ऑनलाईन पोर्टलवर आंबा उत्पादक व ग्राहक, आंबा खरेदी करून विकणारे यांना या पोर्टलवर माहिती उपलब्ध होणार आहे.
अशी करा पोर्टलवर नोंदणी
या पोर्टलवर आंबा उत्पादकांना नेंदणी करताना आंबा उत्पादकाचे नाव, संपर्क क्रमांक, कोणत्या प्रजातीचा आंबा उपलब्ध आहे, याची माहिती भरायची आहे. त्यामुळे मुंबई, पुणे, सांगली तसेच इतर शहरांमधील वैयक्तिक ग्राहक, गृहनिर्माण संस्था यांना मागणी नोंदविता येणार आहे. पणन महामंडळाच्या www.msamb.com या संकेत स्थळावरील buyer seller information लिंकव्दारे अथवा bs.msamb.com या लिंकव्दारे खरेदीदारांना नोंदणीची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे.
खरेदीसाठी 100 डझनची मर्यादा
ऑनलाईन आंबा खरेदी करताना किमान 100 डझन आंबा ग्राहकाला खरेदी करता येणार आहे. पणन महामंडळाने पुणे व मुंबई येथे काही गोदामे तात्पुरते आंबा साठविण्यासाठी उपलब्ध केली आहेत. आंबा थेट सोसायटीमध्ये पोहोचवता यावा, यासाठी वाहन व्यवस्था देखील उपलब्ध करण्यात आली आहे. खरेदीदारांनी एकत्रित मागणी नेंदविणे आवश्यक आहे.
पणनचा चांगला उपक्रम-गोगटे
देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार ऍड. अजित गोगटे म्हणाले, महाराष्ट्र कृषी पणन महामंडळाचे ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून आंबा विक्रीचा चांगला उपक्रम राबविला आहे. आमची संस्था देखील याच्याशी जोडली गेलेली आहे. पणन महामंडळ आंतरराज्य वाहतुकीसाठी अनुदान देत आहे. मात्र, जिल्हय़ांतर्गत देखील वाहतुकीसाठी अनुदान देण्याची आवश्यकता आहे. यासाठी पणन मंडळाने जरुर विचार करावा.