प्रतिनिधी / शिरोडा
बोरी येथील माजी निवृत्त शिक्षक देविदास किन्नरकर यांच्यातर्फे कलमामळ, तळसाय व कुडयाळ बोरी भागात गरजू लोकांना मोफत कडधान्य पुरविण्यात आले. कोरोना महामामुळे लॉकडाऊन झाल्याने अनेक लोकांचा रोजगार बुडला आहे. उदरनिर्वाहासाठी सध्या त्यांना अन्नाधान्याची गरज आहे. अशा शंभर कुटुंबियांना आपण मदतकार्य केल्याचे किन्नरकर यांनी सांगितले.
देविदास किन्नरकर हे पेशाने शिक्षक असले तरी विविध सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग असतो. बोरी पंचायतीच्या प्रभाग 2 मध्ये फिरून गरजू लोकांची माहिती गोळा केली व त्यानुसार त्यांना साहित्याचे वाटप केले, अशी माहिती त्यांनी दिली. कोरोना लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना सामाजिक अंतर पाळतानाच कोणती खबरदारी घ्यावी याविषयी त्यांनी जागृतीही केली.