प्रतिनिधी /बेंगळूर
माजी पंतप्रधान आणि निजद सर्वेसर्वा एच. डी. देवेगौडा यांनी मंगळवारी सायंकाळी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी त्यांनी बेंगळूर-म्हैसूर दहापदरी महामार्गाच्या कामांतर्गत पांडवपूर तालुक्यातील तुबीनकेरे गेट येथे तालुका मार्गाला जोडणारा बायपास रस्ता निर्माण करण्याची विनंती केली. या विनंतीला गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. याप्रसंगी माजी मंत्री एच. डी. रेवण्णा उपस्थित होते.
बेंगळूर-म्हैसूर महामार्ग रुंदीकरण योजनेंतर्गत तुबीनकेरे गावाजवळ यापूर्वी हाती घेतलेली बायपास मार्ग योजना स्थगित करून गणंगुरु येथे बायपास रस्ता निर्माण करण्यात आला. यामुळे मंडय़ापासून पांडवपूरला जाणाऱयांना अधिक अंतर प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे आमदार सी. एस. पुट्टराजू यांनी तुबीनकेरे येथे बायपास निर्माण करण्याची मागणी केली होती. ही बाब देवेगौडा यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.