24 तासात 14 हजार 11 नवे रूग्ण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशभरात एकीकडे रूग्णसंख्या झपाटय़ाने वाढत असतानाच रूग्ण बरे होण्याचे
प्रमाणही काळजी कमी करणारे ठरत आहे. मागील 24 तासांमध्ये देशात 11 हजारांहून अधिक रूग्ण बरे झाले. रूग्ण बरे होण्याचा टक्का 56.38 इतका झाला आहे. मागील 24 तासांमध्ये 14 हजार 821 नवे रूग्ण आढळले. एकुण रूग्णसंख्या 4 लाख 41 हजार 920 वर पोहचली आहे, अशी माहिती केंदीय आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली.
केंद्र सरकार 50 हजार व्हेटिलेटर खरेदी करणार
देशातील वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पंतप्रधान निधीमधून दोन हजार कोटी रुपयांचे 50 हजार व्हेटिलेटर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व व्हेटिलेटर पाच स्वदेशी कंपनीच्या बनावटीची असतील. यातील 30 हजार व्हेटिलेटरची निर्मिती भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमेटेड कंपनी करणार आहे. रूग्णसंख्या सर्वाधिक असणाऱया महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, कर्नाटक, बिहार, राजस्थानमध्ये ती पाठविण्यात येतील. जून अखेरपर्यंत 14 हजार व्हेटिलेटर राज्य सरकारांकडे सुपूर्द केली जातील, असे पंतप्रधान कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले.
पंजाबमधील हॉटेल होणार खुली
सर्व नियमांचे पालन आणि क्षमतेपेक्षा 50 टक्के कमी गर्दीमध्ये राज्यातील हॉटेल व रेस्टॉरंट सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती पंजाबचे अमरिंदर सिंग यांनी मंगळवारी दिली.
देशात एका दिवसात 1 लाख 87 हजारांहून अधिक चाचण्या
देशात वाढत्या कोरोना रूग्णांची संख्येच्या पार्श्वभूमीवर चाचण्यांची संख्याही वाढविण्यात आली आहे. आतापर्यंत 71 लाख 37 हजार 716 चाचण्या घेण्यात आल्या आहेत. सोमवारी एका दिवसात 1 लाख 87 हजार 223 चाचण्या घेण्यात आल्याचे ‘आयसीएमआर’च्या सूत्रांनी सांगितले.