जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल यांनी केली जिल्हाधिकाऱयांकडे तक्रार
प्रतिनिधी/ बेळगाव
देसूरमध्ये निवडणूक मतपत्रिका फुटल्याने मोठा गोंधळ उडाला. या धक्कादायक प्रकाराबद्दल जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल यांनी जिल्हाधिकाऱयांकडे तक्रार केली असून याची सखोल चौकशी करुन संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
पहिल्या टप्प्यातील निवडणुका मंगळवार दि. 22 रोजी होत आहेत. या पार्श्वभूमीवर देसूर येथे हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. मतपत्रिका या पोलीस बंदोबस्तात व सुरक्षित ठेवल्या जातात. मात्र देसूर येथील ही मतपत्रिका फुटल्यामुळे बोगस मतदान होण्याची शक्यता आहे. या प्रकाराला जबाबदार कोण? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल यांनी या घटनेचा निषेध नोंदविला तसेच जिल्हाधिकाऱयांकडे पुराव्यानिशी तक्रार केली आहे. या मतपत्रिकेचे झेरॉक्स काढून जर बोगस मतदान झाले तर मोठी समस्या निर्माण होणार आहे. पहिल्यांदाच असा प्रकार घडला असून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.