वार्ताहर /किणये
बसवाण गल्ली, देसूर येथील राम मंदिराचा लोकार्पण सोहळा मोठय़ा उत्साहात व भक्तिमय वातावरणात झाला. दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. राम, लक्ष्मण, सीता व हनुमान मूर्तींची गावात मोठय़ा जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली.
सोमवारी सकाळी मंदिराची वास्तुशांती करून मूर्ती प्रति÷ापना करण्यात आली. दुपारी राम-लक्ष्मण, सीता व हनुमान यांचा जयघोष करत कळसारोहण करण्यात आले. मंगळवारी सकाळी 10 वाजता सत्यनारायण पूजा व त्यानंतर महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता. सायंकाळी उशिरापर्यंत पंचक्रोशीतील भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
उद्घाटन सोहळय़ाला विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती. या मंदिरात दि. 5 एप्रिलपासून रामनवमीनिमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 5 रोजी सायंकाळी 7 वाजता निलजी येथील विठ्ठल-रखुमाई भजनी मंडळाचा कार्यक्रम, रात्री 9 वाजता काटगाळी येथील लक्ष्मी भजनी मंडळाचा कार्यक्रम, दि. 6 रोजी पिसेदेव भजनी मंडळ, इदलहोंड व विठ्ठल-रुक्मिणी भजनी मंडळ, धामणे, दि. 7 रोजी सायंकाळी 7 वाजता हिरामणी मुचंडीकर यांचे व्याख्यान, त्यानंतर शाहीर व्यंकटेश देवगेकर यांचा पोवाडा, दि. 8 रोजी कुदेमनी येथील संगीत भजन, दि. 9 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर नाटय़प्रयोग, दि. 10 रोजी श्रीराम कथा, इस्कॉनचे भक्त गिरीवरदास यांचे प्रवचन असे कार्यक्रम होणार आहेत. सर्वांनी याचा लाभ घ्यावा, असे कळविण्यात आले आहे.