दोडामार्ग / वार्ताहर:
शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध बेताल वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय मंत्री राणे यांना दोडामार्गात पाय ठेऊ देणार नाही असे शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांनी आज येथे स्पष्ट केले. येथील गांधी चौकात श्री धुरी तसेच शिवसैनिकांनी श्री. राणें विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी निगडित केलेल्या वक्तव्यावरून राणें, भाजप व शिवसेना आमनेसामने आले आहेत. संपूर्ण राज्य तसेच जिल्ह्यात त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. दोडामार्गात देखील आज शिवसैनिकांनी येथील गांधी चौकात एकत्र येत राणें विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. नारायण राणे हे मंत्रिपद भूषवायला लायक नाहीत. त्यांच्याजवळील मंत्रिपद काढून घ्या. राज्याच्या मुख्यमंत्र्याविरोधात आपली बेताल जीभ ताब्यात ठेऊ न शकणाऱ्या राणेंना अद्दल घडलीच पाहिजे दोडामार्गात नारायण राणेंना पाय ठेऊ देणार नाही असा सज्जड इशारा देत निदर्शने केली. यावेळी निदर्शने करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस निरीक्षक आर. जी. नदाफ यांनी कौशल्याने या सर्व परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. यावेळी तालुकाप्रमुख बाबुराव धुरी, उपजिल्हाप्रमुख गणेशप्रसाद गवस, तालुकसंघटक संजय गवस, महिला तालुकाप्रमुख श्रेयाली गवस, जि. प. सदस्य संपदा देसाई, माजी नगराध्यक्ष लीना कुबल, उपजिल्हासंघटक गोपाळ गवस यांसह संतोष मोर्ये, कानू दळवी, मदन राणे, रामदास मेस्त्री, लक्ष्मण आयनोडकर, भगवान गवस, ऑलविन लोबो, विनिता घाडी, दीपाली दळवी, संदेश राणे, बंटी देसाई, गुरुदास सावंत आदी उपस्थित होते