धारबांदोडय़ात कारचालकाचा ताबा गेल्याने स्वयंअपघात,क्रिकेट सामना पाहून परतत होते घरी
प्रतिनिधी / फोंडा
पिळये धारबांदोडा येथे कारगाडीच्या झालेल्या स्वयंअपघातात दोघा युवकांचा मृत्यू तर तिसरा मित्र किरकोळ जखमांवर बचावला आहे. राजदीप नाईक (30, रा. तिस्क-उसगांव, मूळ कासारपाल डिचोली) व सर्वेश गावडे (27, रा. धारबांदोडा, मूळ केरी-फोंडा) अशी मृतांची नावे आहेत. तर शिवम गावस (27, तामसुली धारबांदोडा) हा किरकोळ जखमांवर बचावला. सदर अपघात मंगळवारी उशिरा रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडला.
फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीनिमित्त हे तिघे मित्र क्रिकेट स्पर्धा पाहण्यासाठी धारबांदोडा येथे गेले होते. संजीवनी मैदानावर झालेल्या क्रिकेट स्पर्धेत धारेश्वरी संघ जिंकल्याने तिघेजण आनंदी होते. यावेळी शुभम गावस याने आपली दुचाकी ग्रांऊडजवळ ठेवली होती आणि तो दीपराज याच्या स्विफ्ट कार जीए 04 सी 5111 ने तिस्क उसगांव येथे गेला होता. स्पर्धा 6.30 वा. संपल्यानंतर काही वेळाने झालेल्या रॅली व पार्टीतही ते सामिल झाले. घरी परतत असताना एक साथीदार शुभम याला दुचाकीजवळ पोचवून सगळे आपापल्या घरी जाण्याचा बेत होता.
कारचालकाचा गाडीवरील ताबा गेला
ग्राऊंडजवळ ठेवलेल्या दुचाकीकडे पोचविण्यासाठी जात असताना पिळय़े धारबांदोडा येथे पेट्रोलपंपच्या पुढे गॅरेजजवळ हा अपघात घडला. चालक दीपराजचा वेगात असलेल्या स्विफ्टवरचा ताबा गेल्याने रस्त्याच्या कडेला उंचवटय़ावर कारगाडी कलंडली. यावेळी शुभम हा कारचालकाच्या बाजूला तर सर्वेश पाठीमागील सीटवर बसला होता. चालक राजदीप बाहेर फेकला गेला व त्याचा जागीच मृत्यू झाला. सर्वेश हा अंत्य़त गंभीर अवस्थेत गाडीत अडकला मात्र शुभम केवळ किरकोळ जखमावर बचावला. जमलेल्या जमावाने व पोलिसांनी दोघांची गाडीतून सुटका केल्य़ानंतर सर्वेश बांबोळी येथे उपचार घेत असताना काल बुधवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला.
सर्वेश व राजदीप दोघेही मनमौजी
सर्वेश हा आपल्या आईचा एकमेव आधार होता. करमळे केरी येथे त्याचे मूळ घर आहे. मात्र अधूनमधून तामसुली-धारबांदोडा येथे मामाच्या घराकडे ये-जा करीत होता. दोन वर्षापुर्वी त्याचे पितृछत्र हरपले असून आपल्या आईचा तो एकमेव आधार होता.
राजदीप हा मूळ कासारपाल डिचोली येथील असून तो तिस्क उसगांव येथे राहत होता. मागील काही वर्षापासून व्यवसायात जम बसविला होता. त्याच्या पश्चात आई, वडील व एक बहीण असा परिवार आहे. दोघेही मनमौजी असून राजदीप हा खेळाडूंना प्रत्येक क्रिकेट स्पर्धेत खेळाडूंना प्रात्साहन देण्यासाठी वेगवेगळय़ा तऱहेने बक्षिसे देऊन स्पर्धेत जान आणणारा मनमौजी होता.
फोंडा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीनंतर नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. याप्रकरणी फोंडा पोलिस अधिक तपास करीत आहे.