कोची / वृत्तसंस्था
केरळमधील कोची जिल्हय़ात थोप्पुंपदी पुलाजवळ नौदलाचे ग्लायडर रविवारी सकाळी कोसळले. या दुर्घटनेत नौदलातील दोन अधिकाऱयांचा मृत्यू झाला आहे. सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. लेफ्टनंट राजीव झा (वय 39) आणि पेटी अधिकारी (इलेक्ट्रिकल एअर) सुनीलकुमार पोएला (वय 29) असे दुर्घटनेत मृत्यू झालेल्या अधिकाऱयांचे नाव आहे.
नियमित प्रशिक्षणादरम्यान ग्लायडर कोसळल्याचे नौदलाकडून सांगण्यात आले. या ग्लायडरने आयएनएस गरुडवरुन आकाशात झेप घेतली होती. ग्लायडर कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर या दोन्ही अधिकाऱयांना आयएनएचएस संजीवनी येथे हलवण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. नौदलाने या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.