खासबाग बसवेश्वर सर्कल येथील दुर्गामाता मंदिरापासून सुरुवात
प्रतिनिधी /बेळगाव
मराठी संस्कृतीचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम मागील काही वर्षांपासून दौडमधून केले जात आहे. भगवे फेटे व हातात भगवी निशान घेऊन धारकरी दौडच्या मार्गावर मार्गक्रमण करतात. त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण परिसर फुलांनी सजविला जातो. पारंपरिक वेशात दैवतांचा नाम जप करत काढण्यात आलेल्या दौडमधून मराठमोळय़ा संस्कृतीचे दर्शन घडले.
सहाव्या दिवशीच्या दौडला खासबाग येथील बसवेश्वर सर्कल येथील दुर्गामाता मंदिरापासून सुरुवात झाली. बांधकाम व्यावसायिक अनिल कुकडोळकर व प्रतिष्ठानचे ज्येष्ठ सहकारी शंकर भातकांडे यांच्या हस्ते ध्वज चढविण्यात आला. दुर्गादेवीची आरती करून दौडला प्रारंभ
झाला. बाजार गल्ली वडगाव येथून हरिमंदिर क्रॉस, विष्णू गल्ली येथून मंगाई मंदिर येथे दौडची सांगता झाली. रमेश परदेशी व अर्जुन येळ्ळूरकर यांच्या हस्ते ध्वज उतरविण्यात आला. ध्येयमंत्र म्हणून सहाव्या दिवशीच्या दौडची सांगता झाली.
फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत
मंगळवारी मराठमोळय़ा अशा खासबाग, वडगाव परिसरात दौड काढण्यात आली. प्रत्येक गल्लोगल्ली दौडचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी व शिवशंभूच्या गजराने पहाटेच्यावेळी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. महिलावर्गाकडून औक्षण केले जात होते. गल्लोगल्ली रेखाटलेल्या रांगोळय़ा व आकर्षक फुलांची सजावट नेत्रदीपक ठरत होती.
गुरुवारच्या दौडचा मार्ग
गुरुवार दि. 14 रोजी आठव्या दिवशीच्या दौडला सोमनाथ मंदिर, ताशिलदार गल्ली येथून प्रारंभ होणार आहे. हेमू कलानी चौक, स्टेशन रोडमार्गे शनि मंदिर येथे दौडची सांगता होणार आहे.