पाचव्या व शेवटच्या वनडेत आफ्रिकन संघ 5 गडी राखून विजयी
लखनौ / वृत्तसंस्था
पाचव्या व शेवटच्या वनडेत दक्षिण आफ्रिकन महिला संघाने 5 गडी राखून एकतर्फी विजय मिळवत भारतीय महिला संघाच्या जखमेवर जणू आणखी मीठ चोळले. प्रारंभी, भारतीय महिला संघाचा डाव 49.3 षटकात सर्वबाद 188 धावांवरच गुंडाळला गेला तर प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकन महिला संघाने 48.2 षटकात 5 बाद 189 धावांसह एकतर्फी विजय संपादन केला.
विजयासाठी 189 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऍनेके बॉश (58) व मिग्नॉन डय़ू प्रीझ (57) यांनी तडफदार अर्धशतके झळकावली. मात्र, त्यापूर्वी कर्णधार सूने लूस (10) हिच्यासह त्यांचे पहिले 3 फलंदाज अवघ्या 27 धावांमध्येच परतले होते. पुढे प्रीझ व बॉश यांनी चौथ्या गडय़ासाठी 96 धावांची भागीदारी साकारली आणि संघाला विजयाच्या ट्रकवर आणले.
दक्षिण आफ्रिकन संघ 5 बाद 131 अशा स्थितीत असताना त्यांना 13 षटकात 58 धावांची आवश्यकता होती. त्यानंतर प्रीझने आक्रमण सुरु केले. बॉशच्या 70 चेंडूतील खेळीत 8 चौकारांचा तर प्रीझच्या 100 चेंडूतील खेळीत 4 चौकारांचा समावेश राहिला. मॅरिझेन कॅप्प (नाबाद 36) व नॅदिने (नाबाद 19) यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. भारतीय संघातर्फे डावखुरी फिरकीपटू राजेश्वरी गायकवाड हिने 10 षटकांचा कोटा पूर्ण करताना 13 धावांमध्येच 3 बळी घेतले. पण, तिला अन्य गोलंदाजांची समयोचित साथ लाभली नाही.
मितालीचे नाबाद अर्धशतक
तत्पूर्वी, भारताच्या डावात कर्णधार मिताली राजचे अर्धशतक लक्षवेधी ठरले. मिताली 104 चेंडूत 8 चौकार, 1 षटकारासह 79 धावांवर नाबाद राहिली. हरमनप्रीत कौर 13 धावांवर दुखापतीमुळे निवृत्त झाली. मितालीसमवेत तिने चौथ्या गडय़ासाठी 71 धावांची भागीदारी साकारली. भारताचे पहिले 3 फलंदाज 53 धावात गारद झाले होते. यात प्रिया पुनिया (18), पूनम राऊत (10) व स्मृती मानधना (18) यांचा समावेश राहिला. सलग पडझड होत असताना मितालीच्या प्रयत्नांवर बऱयाच मर्यादा राहिल्या. मिताली 79 धावांवर नाबाद राहिली.
कोव्हिड-19 मुळे सक्तीने वर्षभराचा ब्रेक घ्यावा लागल्यानंतर भारतीय महिला संघासाठी ही पहिलीच मालिका होती तर दक्षिण आफ्रिकन महिला संघासाठी ही दुसरी मालिका होती. मात्र, भारतीय महिला संघाची या मालिकेतील खराब कामगिरी पाहता, त्यांना आगामी विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर, बरीच मेहनत घ्यावी लागेल, हे स्पष्टपणे दिसून आले. महिला गटातील विश्वचषक स्पर्धा पुढील वर्षातील पहिल्या टप्प्यातच होणार आहे.
संक्षिप्त धावफलक
भारतीय महिला ः 49.3 षटकात सर्वबाद 188 (मिताली राज 104 चेंडूत 8 चौकार, 1 षटकारासह नाबाद 79, हरमनप्रीत कौर 55 चेंडूत 3 चौकारांसह 30, प्रिया पुनिया, स्मृती मानधना प्रत्येकी 18 धावा. अवांतर 15. नॅदिने 10 षटकात 3-35, नॉडय़ुमिसो, सेखुखूने प्रत्येकी 2 बळी).
दक्षिण आफ्रिका महिला ः 48.2 षटकात 5 बाद 189 (ऍनेके बोश्च 70 चेंडूत 8 चौकारांसह 58, मिग्नॉन डय़ू प्रीझ 100 चेंडूत 4 चौकारांसह 57, मॅरिझेन 42 चेंडूत नाबाद 36, नॅदिने नाबाद 19. राजेश्वरी गायकवाड 10 षटकात 3-13, हेमलता, प्रत्युषा प्रत्येकी 1 बळी).