प्रतिनिधी /मडगाव
दक्षिण गोवा युवा काँग्रेसचे अध्यक्ष उबेद खान यांनी आपल्या सुमारे 100 समर्थकासह काल तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी तृणमूल काँग्रेसचे नेते तथा बंगालचे जलस्त्रोतमंत्री डॉ. मानस रंजन भूनिया यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी मडगावचे नगरसेवक तथा तृणमूल काँग्रेसचे स्थानिक नेते महेश आमोणकर उपस्थित होते.
आपण 49 वर्षे काँग्रेस पक्षात होतो. बंगाल प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपद आपण भुषविले होते. त्यानंतर आपण तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला व आज ममता दीदी बरोबर काम करीत आहोत. धर्मनिरपेक्ष राजकारणाला तृणमूल काँग्रेस प्रोत्साहन देत आहे. सर्व धर्म समभाव ही भारत देशाचे ब्रिद राहिले आहे. त्याचा आम्ही आदर करतो. सर्व जाती-धर्म बाजूला ठेवून आमच्या नेत्या ममता बॅनर्जी व अभिषेक बॅनर्जी यांनी राजकारण केले असून सर्वांना सोबत घेऊन जात आहोत. प्रत्येक राज्यात ही परंपरा आम्ही पुढे नेत असल्याचे डॉ. मानस रंजन भूनिया यावेळी म्हणाले.
गोव्यात होत असलेल्या निवडणुकात तृणमूल काँग्रेस उतरली असून तृणमूल काँग्रेसचे नेते गोव्यात आले व त्यांनी तृणमूल काँग्रेसची ध्येय धोरणे गोव्यातील जनतेसमोर ठेवली आहे. मडगाव मतदारसंघात, मडगावची जनता तृणमूल काँग्रेसला साथ देणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
आपल्याला सत्तेची हाव नाही. आपण जनतेसाठी काम करीत आलो आहे. आम्ही समाज सेवा करतो. त्यासाठी पक्ष आम्हाला महत्वाचा वाटत नाही. पक्ष हे एक व्यासपीठ असते. एखादा पक्ष जर आमच्या विरोधात काम करीत असेल तर आम्ही त्यांच्या विरूद्ध जाणार आहोत. उद्या जर तृणमूल काँग्रेस गोव्यातील जनतेच्या विरोधात काम करू लागली तर आम्ही तिच्या विरोधात उभे ठाकणार आहोत. आम्हाला समाज कार्य करायचे आहे. आम्हाला सत्तेची हाव नाही. त्यामुळे आम्हाला कोणताही राजकीय पक्ष चालतो. फक्त तो राजकीय पक्ष सर्वांना सोबत नेणारा असला पाहिजे. आपण गेली 12 वर्षे युवा काँग्रेसमध्ये होतो. आपल्या काँग्रेस पक्षासंदर्भात काहीच बोलायचे नाही. पेंद्रात व गोव्यातील काँग्रेस पक्षात फरक आहे. आम्हाला प्रश्न आहे तो मान-सन्मानाचा. सर्वांचा आदर हा व्हायलाच पाहिजे. गोव्यात काँग्रेस पक्ष कुणाचा आदर करीत नसल्याने आपण तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याचे उबेद खान यावेळी म्हणाले.
मडगावात फॅमिली राजचे राजकारण सुरू होत आहे. काँग्रेस पक्षाचे केंद्रीय नेते ज्या पद्धतीने फॅमिली राज करतात, तिच परंपरा गोव्यात सुरू होत आहे. आपण तसेच आपल्या मुलांना राजकारणात आणले जात आहे. त्यामुळे इतरांना राजकारणात संधी नाही. त्यामुळे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते दुखावले जात असल्याने ते अन्य पक्षात प्रवेश करीत असल्याचे महेश आमोणकर यावेळी म्हणाले. तृणमूल काँग्रेसने जनतेसाठी ज्या योजना आणल्या आहेत. त्या योजना उबेद खान यांच्या पसंतीस आल्या असून आज ते तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करीत असल्याने आपल्याला तसेच तृणमूल काँग्रेसला आनंद होत असल्याचे ते यावेळी म्हणाले.