बनावट चेक घोटाळे रोखण्यासाठी उपाययोजना
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
बनावट चेक (धनादेश) देऊन बँकांच्या खात्यातील रकमा पळवणाऱयांना पायबंद घालण्यासाठी आता रिझर्व्ह बँकेने पॉझिटिव्ह पे सिस्टीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 50 हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेचा धनादेश दिल्यास तो चेक दिल्यानंतर त्याची माहिती पुन्हा एकदा बँकेला आपणच धनादेश दिला असल्याची खातरजमा करावी लागेल. मोठय़ा धनादेश व्यवहारांमध्ये बँक खातेदाराकडून ‘पॉझिटिव्ह पे सिस्टीम’नुसार माहिती येणार नाही तोपर्यंत धनादेशाची रक्कम लाभधारकाच्या खात्यात जमा केली जाणार नाही. ही व्यवस्था जानेवारी 2021 पासून सुरू केली जाणार आहे. मात्र 50 हजारापासून 5 लाखापर्यंतच्या धनादेशासाठी ही व्यवस्था ऐच्छिक राहील. पाच लाखांपेक्षा अधिक रकमेच्या धनादेशासाठी ही सुविधा मात्र अनिवार्य असणार आहे. या नियमावलीचा लाभ घेणाऱयाची नोंद बँकेत असेल आणि त्याने एखादा धनादेश दिल्यानंतर ही माहिती बँकेकडे आली नाही तर तो धनादेश त्याने दिला नसल्याचे दिसून येईल. एखाद्या फसवणुकीच्या प्रकारात धनादेश काढणारा खातेदार हा या नव्या यंत्रणेचा वापर करीत असेल तरच त्याला तक्रार निवारणाच्या प्रक्रियेत फिर्यादी होण्याचा अधिकार असणार आहे.
धनादेशाची माहिती खातेदाराने पाठवल्यानंतर ती दिलेल्या धनादेशाशी पडताळून पाहिली जाईल. काहीवेळा धनादेश दिलेला असतो पण तो ज्याच्या नावाने दिलेला असतो तो त्या धनादेशावरील रकमेत फेरफार करून मोठी रक्कम लिहू शकतो. या व्यवस्थेने अशाही प्रकारचे गैरव्यवहार टळू शकतात. अशा प्रकारात खातेदाराची बँक आणि तो धनादेश ज्या बँकेत जमा केला असेल ती बँक अशा दोघांनाही तपशील पडताळून पाहता येईल.