उत्तर प्रदेशात दोन मौलानांना अटक -धर्मांतरासाठी पाकिस्तानी गुप्तचर संस्थेतून फंडिंग
लखनौ / वृत्तसंस्था
उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) धर्मांतर रॅकेटचा पर्दाफाश करत दोन मौलानांना अटक केली आहे. मोटिवेशनल थॉटद्वारे हिंदूंचे धर्मांतर केल्याच्या आरोपातून लखनौमध्ये ही कारवाई करण्यात आली. अटक केलेले मौलाना लखनौमधील एका मोठय़ा मुस्लीम संघटनेशी संबंधित आहेत. एटीएसची टीम सुमारे चार दिवस त्यांची चौकशी करून पुरावे गोळा करत होती. पाकिस्तानची गुप्तचर संस्था ‘आयएसआय’ त्यांना आर्थिक मदत करत असल्याचे तपासात समोर आले आहे.
मुफ्ती काझी जहांगीर कासमी आणि मोहम्मद उमर गौतम या दोघांना एटीएसने सोमवारी अटक केली. राष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या या धर्मांतर रॅकेटचा ते भाग असल्याचे उत्तर प्रदेश पोलिसांनी म्हटले आहे. दक्षिण दिल्लीतील जामियानगर भागात मुफ्ती काझी जहांगीर कासमी आणि मोहम्मद उमर गौतम हे दोघे राहतात. त्यांचा धर्मांतर रॅकेटमध्ये सहभाग असून, मूकबधीर मुले आणि महिलांचे धर्मांतर केल्यांच्या घटनांमध्ये त्यांचा सहभाग असून त्यांनी आजवर 1 हजारांपेक्षा जास्त लोकांचे धर्मांतर केल्याचे उत्तर प्रदेश पोलिसांनी म्हटले आहे. धर्मांतर करणाऱया रॅकेटला विदेशातून पैसा पुरवला जात असल्याचे पुरावे पोलिसांना प्राप्त झाले आहेत. त्यात परदेशातून पुरवल्या जाणाऱया पैशांसंदर्भातील कागदपत्रांचाही समावेश आहे. आता या रॅकेटमध्ये सापडलेल्या अन्य लोकांचा शोध घेण्यात येत आहे.
एटीएस अधिकाऱयांनुसार ते गरीब हिंदूंना लक्ष्य करायचे. आतापर्यंत सुमारे एक हजार लोकांचे धर्मांतर करण्यात आले असून यामध्ये मोठय़ा संख्येने मूकबधीर आणि महिलांचा समावेश आहे. रामपूरमधील एका गावात दोन हिंदू मुलांची जबरदस्ती सुंता (खतना) करून धर्मांतर करण्यामध्ये एका मौलानाचा हात असल्याचे समोर आले आहे. हे दोघेही पश्चिम उत्तर प्रदेशमधील रहिवासी आहेत. त्यांना परदेशातून कार्यरत असलेली एक मुस्लीम संघटना आर्थिक मदत करत होती. एटीएस त्यांच्याविषयी अधिक माहिती गोळा करत असल्याची माहिती उत्तर प्रदेशचे अतिरिक्त महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी दिली.
कानपूर, वाराणसी, नोएडात कारनामे
अटकेतील मौलानांनी नोएडा डेफ सोसायटीतील मूकबधीर शाळेतील विद्यार्थ्यांना आमिष दाखवून आणि प्रलोभन देऊन धर्म परिवर्तन करून घेतले आहे. धर्मांतर झालेल्या एक हजार महिला आणि मुलांची यादी प्राप्त झाली आहे. कानपूर, वाराणसी आणि नोएडा येथील अनेक मुले व महिलांचेही धर्मांतर झाले आहे. कानपूरमधील मुलाला दक्षिणेकडील शहरात नेण्यात आल्याची माहिती उघड झाली असून त्याचा अधिक तपास सुरू आहे. गोमतीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी राज्यात लागू करण्यात आलेल्या धर्मांतर विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात इस्लामिक दवाह केंद्राच्या अध्यक्षांचाही एफआयआरमध्ये उल्लेख करण्यात आला आहे.