न्यूझीलंड दौऱयाच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट संघाला लागोपाठ धक्के,
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
न्यूझीलंडविरुद्ध दौऱयाच्या उंबरठय़ावरच भारतीय संघाला दुहेरी झटके बसले. शुक्रवारपासून खेळवल्या जाणाऱया टी-20 मालिकेत शिखर धवन बाहेर फेकला गेला असून अनुभवी जलद गोलंदाज इशांत शर्मा कसोटी मालिकेत खेळू शकणार नसल्याचे निश्चित आहे. धवनच्या गैरहजेरीत टी-20 मालिकेसाठी संजू सॅमसन व वनडे मालिकेसाठी पृथ्वी शॉला संघात जागा देण्यात आली आहे.
धवनला बेंगळूरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या तिसऱया वनडेत क्षेत्ररक्षण करत असताना खांद्याला दुखापत झाली तर दुसरीकडे, इशांत शर्माला रणजी लढतीत गुडघा दुखावल्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी अनफिट जाहीर केले गेले. भारत-न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिका दि. 21 फेब्रुवारीपासून खेळवली जाणार आहे.
‘शिखर धवनऐवजी पर्यायी खेळाडू लवकरच न्यूझीलंडला रवाना होईल. याशिवाय, इशांत शर्माच्या एमआरआय अहवालानुसार त्याची दुखापत गंभीर असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याला 6 आठवडय़ांची विश्रांती व पुन्हा तंदुरुस्त होण्यासाठी कालावधी द्यावा लागेल. दुखापत बरी होण्यासाठी किमान 3 आठवडे कोणत्याही परिस्थितीत लागतीलच’, असे दिल्ली व जिल्हा क्रिकेट संघटनेचे महासचिव विनोद तिहारा यांनी नमूद केले.
भारतीय संघ न्यूझीलंड दौऱयात 5 टी-20, 3 वनडे व 2 कसोटी सामने खेळणार असून दि. 24 जानेवारी रोजी होणाऱया पहिल्या टी-20 मालिकेने या मालिकेला प्रारंभ होईल. इशांतची जागा दिल्लीचा नवोदित गोलंदाज नवदीप सैनी घेईल, असे सध्याचे संकेत आहेत.
धवनची दुखापत नव्या वर्षातील आहे आणि रविवारी तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध फलंदाजीला उतरु शकला नव्हता. एक्स-रेमध्ये धवनच्या डाव्या खांद्याला दुखापत झाल्याचे स्पष्ट झाले. धवनच्या गैरहजेरीत केएल राहुल रोहित शर्माच्या साथीने सलामीला उतरला. धवनला डाव्या हाताला स्लिंग लावल्याचे त्यावेळी दिसून आले.
34 वर्षीय धवन दुसऱया वनडेत पॅट कमिन्सचा बाऊन्सर बरगडीवर आदळल्यानंतर पुढे पूर्ण वेळ सामन्यात उतरु शकला नव्हता. याशिवाय, मागील महिन्यात विंडीजविरुद्ध मर्यादित षटकांची मालिका देखील तो खेळू शकला नव्हता. इंग्लंडमधील 2019 विश्वचषक स्पर्धेतही ऑस्ट्रेलियाविरुद्धच त्याला दुखापत झाली होती. त्या लढतीत धवनने शतक झळकावले होते.
बॉक्स
भारतीय संघ ऑकलंडमध्ये दाखल
ऑकलंड : विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ मंगळवारी ऑकलंडमध्ये दाखल झाला. भारताचा हा दौरा सहा आठवडय़ांचा अर्थात दीड महिन्यांचा असून भारतीय संघ यात 5 टी-20 सामन्यानंतर 3 वनडे व 2 कसोटी सामनेही खेळणार आहे. दोन्ही कसोटी सामने विश्व कसोटी चॅम्पियनशिपचा भाग असतील.
Touchwood Auckland. Let’s go असा संदेश भारतीय कर्णधार विराट कोहलीने इन्स्टाग्रामवरुन दिला. शिवाय, श्रेयस अय्यर व शार्दुल ठाकुर यांच्यासमवेतचे छायाचित्रही शेयर केले. भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला वनडे मालिकेत 2-1 अशी धूळ चारल्यानंतर न्यूझीलंडमध्ये पोहोचला असून कोहलीने यजमान संघावर पहिल्या चेंडूपासूनच दबाव टाकण्याची रणनीती असेल, असे स्पष्ट केले होते. भारताने यापूर्वी गतवर्षी न्यूझीलंड दौऱयात वनडे मालिकेत 4-1 असा दमदार विजय संपादन केला तर टी-20 मालिकेत 1-2 असा पराभव स्वीकारला होता.
कोटस
न्यूझीलंडमधील खेळपट्टय़ांचे स्वरुप मागील काही वर्षात बरेच बदलले आहे. 2009 मधील हॅमिल्टनची खेळपट्टी व आताची खेळपट्टी यात कमालीचा फरक आहे. तेथील सर्व खेळपट्टय़ा आता फलंदाजीला पोषक आहेत.
-माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकर
बॉक्स
भारत-न्यूझीलंड मालिकेची रुपरेषा
तारीख / लढत / भारतीय प्रमाणवेळ / ठिकाण
24 जानेवारी / पहिली टी-20 / दुपारी 12.30 वा. / ऑकलंड
26 जानेवारी / दुसरी टी-20 / दुपारी 12.30 वा. / ऑकलंड
29 जानेवारी / तिसरी टी-20 / दुपारी 12.30 वा. / हॅमिल्टन
31 जानेवारी / चौथी टी-20 / दुपारी 12.30 वा. / वेलिंग्टन
2 फेब्रुवारी / पाचवी टी-20 / दुपारी 12.30 वा. / माऊंट माऊनगनुई
5 फेब्रुवारी / पहिली वनडे (दिवस-रात्र)/ सकाळी 7.30 वा. / हॅमिल्टन
8 फेब्रुवारी / दुसरी वनडे (दिवस-रात्र) / सकाळी 7.30 वा. / ऑकलंड
11 फेब्रुवारी / तिसरी वनडे (दिवस-रात्र)/ सकाळी 7.30 वा. / माऊंट माऊनगनुई
21 ते 25 फेब्रुवारी / पहिली कसोटी / पहाटे 4 पासून / वेलिंग्टन
29 फेब्रुवारी ते 4 मार्च / दुसरी कसोटी / पहाटे 4 पासून / ख्राईस्टचर्च