चिपळूण-कोंढे येथील प्रकार
प्रतिनिधी/ चिपळूण
कोंढे येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या धान्य दुकानात धान्याच्या झालेल्या अपहारप्रकरणी सोसायटीचे चेअरमन व सेल्समनवर मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिधापत्रिकाधारकांना कमी धान्य देऊन ते ऑनलाईनला अधिक दाखवणे संबंधितांच्या अंगाशी आले आहे. याची तक्रार तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांनी दिली आहे. यामुळे दुकानदारांमध्ये खळबळ उडाली आहे.
कोरोनाच्या भीतीमुळे सर्वत्र लॉकडाऊन आहे. त्यामुळे अनेक गरिबांवर बिकट परिस्थिती उद्भवली आहे. त्यातून त्यांना सावरण्यासाठी सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती, प्रशासकीय यंत्रणा प्रयत्न करीत आहे. एवढेच नव्हेतर कोणीही उपाशी राहू नये म्हणून शासनही वेगवेगळय़ा योजना आणत आहे. यातीलच अंत्योदय व प्राधान्य कुटुंबांना माणसी 5 किलो मोफत तांदूळ ही योजना आहे. त्यानुसार हजारो टन तांदूळ येथे उपलब्ध झाला असून त्याचे दुकानदारांमार्फत वाटप झाले आहे. मात्र वितरणात गोंधळ होत असल्याच्या तक्रारी झाल्या आहेत.
कोंढे येथे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे रेशन दुकान आहे. येथे चुकीच्या पध्दतीने धान्य वाटप करून अपहार केल्याची तक्रार सर्फराज कोळथरकर व काही ग्रामस्थांनी 17 एप्रिल रोजी केली होती. त्यानुसार तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांनी या दुकानाची सखोल चौकशी केली. त्यात कोळथरकर यांना नियमित 15 किलो तांदूळ दिला असताना तो ऑनलाईनला 21 किलो, 10 किलो गहू दिला असताना 14 किलो, मोफत 20 किलो धान्य दिले असताना 35 किलो धान्य दाखवल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे सूर्यवंशी यांनी आपला चौकशी अहवाल जिल्हा पुरवठा अधिकाऱयांकडे पाठवला होता. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरून मिळालेल्या आदेशानुसार सोसायटीचे चेअरमन दिलीप हरी माटे, सेल्समन अमित बाबाराम खेडेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत. येथील हा पहिलाच गुन्हा आहे. त्यामुळे दुकानदारांमध्ये खळबळ उडाली आहे.
…तर कडक कारवाई करणार: सूर्यवंशी
या बाबत बोलताना तहसिलदार सूर्यवंशी म्हणाले की, शासनाने जे धान्य दिले आहे. त्याचे नियमानुसार वाटप होणे गरजेचे आहे. त्यामुळे यापुढे दुकानदार ते व्यवस्थिपणे करतील, अशी आशा आहे. मात्र कोणीही धान्याचा अपहार केला व त्याची चौकशी झाली तर मात्र कडक कारवाई केली जाईल, अशा इशारा त्यांनी दिला.