रोजगार हमी योजनेतून आतापर्यंत 28 लाखाचे काम झाल्याची पीडीओंची माहिती
वार्ताहर / धामणे
धामणे ग्राम पंचायतीतर्फे रोजगार हमी योजनेंतर्गत कामाची सुरुवात जोमाने झाली असून धामणे कार्यक्षेत्रातील धामणे, कुरबरहट्टी, मासगौंडहट्टी, देवगणहट्टी येथील महिला व पुरूष अशा दररोज 500 ते 550 नागरिकांना रोजगार मिळत आहे.
धामणे गावच्या शेजारी शेतवडीत असलेल्या सर्वे नं. 63 प्लस 97 (3 एकर 18 गुंठे) या कुंती तलावाच्या खोदाईचे काम गेल्या 15 दिवसांपासून सुरू आहे. याकामी दररोज 500 ते 550 महिला व पुरुष रोजगार कामाला आहेत. शासनाकडून दररोज प्रत्येक कामगाराला 285 रुपये रोजंदारी मिळत असल्याने या रोजगार कामाकडे येथील नागरिकांचा कल वाढला आहे.
शासनाकडून प्रत्येक ग्राम पंचायत कार्यक्षेत्रातील रोजगार वर्षातून 100 दिवस देण्यात येतो. यामध्ये काही नैसर्गिक आपत्ती आली तर पुन्हा 15 दिवस जादा रोजगार देण्यात येतो. शासनाच्या या रोजगार हमी योजनेमुळे गरीब नागरिकांना चांगला लाभ होत असल्याचे रोजगार करणाऱया महिलांकडून सांगण्यात आले.
तलाव शेतवडीत असल्याने फायदा
आतापर्यंत धामणे ग्राम पंचायतच्यावतीने नाल्याची साफसफाई, धामणे स्मशान भूमीत झाडे लावण्यासाठी 200 खड्डय़ांची खोदाई& करण्यात आली असून आता गेल्या 15 दिवसांपासून येथील कुंती तलावाची खोदाई सुरू आहे. हा कुंती तलाव शिवारात असल्याने येथील शेतकऱयांना याचा फायदा चांगला होणार आहे. गेल्या दीड महिन्यात रोजगार हमी योजनेतून 28 लाख रुपयाचे काम झाल्याची माहिती ग्रा. पं. पीडीओ विना हडपद यांनी दिली.