मालवण तहसीलदार अजय पाटणेंच्या आदेशाने कारवाई
वार्ताहर /चौके:
मालवण तहसीलदार अजय पाटणे यांच्या आदेशानंतर धामापूर व आंबेरी मळा येथील अनधिकृत वाळू उत्खननासाठी वापरण्यात येणारे वाळूचे रॅम्प तोडण्याची कारवाई नुकतीच धामापूर व आंबेरी येथे करण्यात आली.
आंबेरी मळा येथील तीन रॅम्प व धामापूर येथील आठ रॅम्प जमीनदोस्त करण्याची कार्यवाही पोलीस संरक्षणात करण्यात आली. धामापूर तसेच आंबेरी मळा येथे अनधिकृत वाळू उत्खनन सुरू असल्याच्या तक्रारी वारंवार तहसीलदारांकडे केल्या जात होत्या. त्यामुळे मालवण तहसीलदारांनी हे रॅम्प तोडण्याचे आदेश दिले होते. आंबेरी मंडल अधिकारी अनिल पवार यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. मोहिमेमध्ये तलाठी रविराज शेजवळ, सी. एम. पेडणेकर, शिपाई संतोष गावडे, पोलीस ए. एम. सरंगळे, एम. बी. पुरवाडे सहभागी झाले होते.