प्रतिनिधी /धारबांदोडा :
धारबांदोडा तालुक्यात कोविड निगा केंद्र सुरु करण्यासाठी 44 खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. गरज भासल्यास हे निगा केंद्र सुरु करण्यात येईल. तालुक्यातील रुग्णसंख्या नियंत्रणात असून या आजारातून मुक्त झालेल्या रुग्णांनी स्वच्छेने प्लझ्मा दान करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन वीजमंत्री निलेश काब्राल यांनी केले.
कोरोना देखरेखीसंबंधी धारबांदोडा तालुक्याची जबाबदारी मंत्री काब्राल व स्थानिक आमदार तथा बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे. या पार्श्वभूमिवर काल मंगळवारी झालेल्या बैठकीत मंत्री निलेश काब्राल यांनी येथील परीस्थितीचा आढावा घेतला. यावेळी मंत्री दीपक पाऊसकर, जिल्हाधिकारी प्रदीप नाईक आदी उपस्थित होते. कोरोना संसर्गाचा फैलाव कुणाला कसा होईल हे सांगता येणार नाही. त्यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. सार्वजनिक गणेशोत्सव अकरा, नऊ किंवा सात दिवस साजरा न करता तो दीड दिवसच मर्यादित स्वरुपात साजरा करावा. त्यासाठी सरपंच व गणेशोंत्सव मंडळांनी पुढाकार घेण्याची सूचना यावेळी करण्यात आली. कोरोना संबंधी नियमांचे उल्लंघन करणाऱया नागरिकांना दंड ठोठावताना त्यामागील उद्देश सफल झाला पाहिजे. केवळ दंड देऊन भागणार नाही, जागृतीही तेवढीच महत्त्वाची आहे, असा सल्ला त्यांनी सरकारी अधिकाऱयांना दिला.
मंत्री पाऊसकर म्हणाले, तालुक्यातील पोलीस, पंचायत मंडळ, विविध खात्यांचे सरकारी अधिकारी तसेच नागरिकांचे सहकार्य व त्यांनी घेतलेल्या खबरदारीमुळे तालुक्यात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आहे. यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मर्यादित स्वरुपात साजरा करण्याचे आवाहनही त्यांनी केले. बैठकीला डॉ. विल्सन फर्नांडिस, गटविकास अधिकारी श्री. राणे, कुळे पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक सुमंत गावकर, कुडचडे पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक वैभव नाईक, धारबांदोडय़ाच्या सरपंच स्वाती तिळवे, उपसरपंच परेश खुटकर, साकोर्डाचे सरपंच जितेंद्र नाईक, पंचसदस्य यशवंत बांदोडकर, रमाकांत गावकर, बाली गावकर, दिनानाथ गावकर, राजेश सांगोडकर आदी उपस्थित होते. डॉ. विल्सन फर्नांडिस यांनी धारबांदोडा तालुक्यात सध्या अकरा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असून 31 जण कोरोनामुक्त झाल्याची माहिती दिली. 14 ते 20 जुलै दरम्यान 228 लोकांचे स्वॅब नमूने घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
कुळे पोलीसांनी मास्क न वापरल्याबद्दल 157 लोकांना कुडचडे पोलिसांनी दाभाळ पंचायत क्षेत्रात 20 जणांना दंड दिल्याची माहिती पोलीस निरीक्षकांनी दिली. तलाठी व पंचायत सचिवाकडून मोले भागात 2, साकोर्डा पंचायत क्षेत्रात 2, दाभाळ, धारबांदोडा व कुळे पंचायत क्षेत्रात प्रत्येकी एका नागरिकाला दंड ठोठावल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.