कोरोना बळी ठरलेल्या महिलेचे दागिनेही भस्मसात
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना महामारीमुळे दगावणाऱयांची संख्या दिवसेंदिवस वाढती आहे. त्यामुळे सहाजिकच जनमाणसात त्याची धास्तीही वाढत चालली आहे. एखाद्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर सरकारी यंत्रणेकडूनच या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जातात. कुटुंबीयांना केवळ अंत्यदर्शनासाठी मुभा दिली जाते. त्यामुळे मृतदेहाबरोबर आणखी काय काय जळाले याची कल्पनाही कोणाला राहत नाही.
लक्ष्मीनगर, हिंडलगा येथील कोरोना बळी ठरलेल्या एका वृद्धेवर अंत्यसंस्कार करताना तिच्या अंगावरील साडेचार तोळय़ांच्या दागिन्यांसह तिला अग्नि देण्यात आला आहे. रविवारी हा धक्कादायक प्रकार घडला आहे. सोमवारी राख भरणाऱया कुटुंबीयांना या दागिन्यांचे वितळलेले तुकडे सापडले आहेत.
लक्ष्मीनगर येथील 65 वषीय वृध्देला 16 जुलै रोजी उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. दोन दिवसांनंतर या वृध्देचा मृत्यू झाला. तिचे स्वॅब तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे या वृध्देची सेवा करण्यासाठी इस्पितळात गेलेल्या त्यांच्या कुटुंबियांनाही तेथून बाहेर पाठविण्यात आले.
इस्पितळातून बाहेर पडण्यापुर्वी वैद्यकीय कर्मचाऱयांनी त्यांना या वृध्देचे गंठण, कर्णफुले व इतर काही दागिने काढुन कर्मचाऱयांनी कुटुंबियांकडे सोपविले होते. ज्या हाताला सलाईन लावण्यात आले होते त्या हातात साडेचार तोळय़ांचे बिल्वर व पाटल्या होत्या. त्यामुळे त्या काढता आल्या नाहीत. आधी या वृध्देला बरे वाटू द्या म्हणून कुटुंबियांनीही त्याकडे लक्ष दिले नाही.
शनिवारी 18 जुलै रोजी उपचाराचा उपयोग न होता त्या वृध्देचा मृत्यू झाला. त्यादिवशी मृतदेह कुटुंबियांकडे सोपविण्यात आला नाही. रविवारी 19 जुलै रोजी दुपारी कुटुंबातील मोजक्मया सदस्यांना मृतदेहाचे दर्शन घडवून या वृध्देचा मृतदेह सदाशिवनगर स्मशानभूमीत नेण्यात आले व अंत्यसंस्कार करण्यात आला. तोपर्यंत दागिन्यांची आठवण कोणलाच नव्हती. कुटुंबियही दुःखात होते. त्यामुळे दागिन्यांचा विचार कोणाच्याच मनात आला नाही.
रविवारी रात्री हातातल्या साडेचार तोळय़ांचे दागिने कोणाकडे सोपविले आहेत? असा विचार सुरु झाला. घरातील सर्व मंडळी क्वारंटाईनमध्ये होती. त्यामुळे आता कोणाला भेटून विचारायचे? असा प्रश्न पडला. शेवटी सोमवारी इस्पितळ प्रशासनाकडे यासंबंधी चौकशी करण्याचे ठरविण्यात आले. त्या आधी रक्षाविसर्जनासाठी कुटुंबीय स्मशानात पोहोचले. यावेळी दागिन्यांचे तुकडे राखेत आढळून आले.
कोरोना महामारीने वृध्देचा तर बळी गेलाच. कोरोनाच्या धास्तीने अंगावरील साडेचार तोळय़ांचे दागिनेही भस्मसात झाले. कोरोना बळींचा मृतदेहाला इतर कोणालाही स्पर्श करण्याची परवानगी नाही. लांबून अंत्यदर्शनाची मुभा दिली जाते. मृत्यूनंतर सरकारी मार्गसुचीनुसार मृतदेह प्लास्टीकमध्ये गुंडाळला जातो. या प्रक्रियेत मृताच्या अंगावर काय राहिले की नाही, हे कोणीच बघितले जात नाही. त्यामुळे असा प्रकार घडला आहे.