क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटक राज्य शरीरसौष्टव व नंजनगुड स्पोर्ट्स फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 17 वी वज्रदेह राज्यस्तरीय शरीरसौष्टव स्पर्धा रविवार दि. 19 डिसेंबर रोजी ज्युनियर कॉलेज मैदान नंजनगुड येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांची मिस्टर इंडिया स्पर्धेसाठी निवड करण्यात येणार आहे.
सदर स्पर्धा आयबीबीएफ मुंबईच्या नियमानुसार 55, 60, 65, 70, 75, 80, 85 व 85 वरील वजन गटात घेण्यात येणार आहे. प्रत्येक गटातील पहिल्या पाच विजेत्यांना अनुक्रमे 5 हजार रु., 4 हजार रु., 3 हजार रु., 2500 रुपये, 2 हजार रुपये अशी रोख रक्कम, पदके, प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात येणार आहे. वज्रदेह किताब विजेत्या शरीरसौष्टवपटूला 30 हजार रुपये रोख, आकर्षक चषक, भेटवस्तू तर पहिल्या उपविजेत्या स्पर्धकाला 20 हजार रुपये रोख, आकर्षक चषक आणि दुसऱया उपविजेत्याला 10 हजार रुपये रोख, चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. उत्कृष्ट पोझरला मानाचा किताब, रोख 8 हजार रुपये, प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेतील विजेत्या 12 शरीरसौष्टवपटूंतून तेलंगणा येथे होणाऱया मिस्टर इंडिया स्पर्धेसाठी निवड करण्यात येणार आहे. इच्छुक स्पर्धकांनी अधिक माहितीसाठी गंगाधर एम., उमा महेश यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आशिया पंच अजित सिद्धण्णावर यांनी केले आहे.