प्रतिनिधी/ गोडोली
ऐतिहासिक सातारा शहरालगत राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने शहराचा लौकिक वाढविण्यासाठी वाढे फाटा, बॉम्बे रेस्टॉरंट, अजंठा चौकातील महामार्ग पुलाखालील जागेच्या सुशोभीकरण सातारा नगरपालिकेने तब्बल 6 कोटी खर्चाचा प्लॅन तयार केला आहे. वाढे फाटा येथे कास, ठोसेघर तर अजंठा चौकात आर्मी बेस तसेच बॉम्बे रेस्टॉरंट चौकात वॉकिंग ट्रक, ओपन जीम, बैठकीसाठी बेंच सोबत लक्षवेधी पेंटवर्क आणि सुशोभीकरण करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी दिली.
सध्या खेड ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पिरवाडी मधील गट नं.13/34 अ या शासकीय जागेवर अनेकांनी अतिक्रमण केले आहे. वाढे फाटा, अजंठा चौक, बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील पुलाखालील जागेवर पेंट आर्टमधून सातारच्या सौंदर्यात अधिक भर टाकण्यासाठी होणाऱया सुशोभीकरणाचा प्लॅन तयार करण्यात आला आहे. बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील पुलाखाली एका बाजूला ट्रक पार्किंग तर दुसऱया बाजूला पेंट आर्टमधून आणि नैसर्गिक बेस असणाऱया कलाकृती साकारणार आहेत. अजंठा चौकातील पुलाखाली आर्मी बेस पेंटिंगमधून देशाचा गौरवशाली इतिहास साकारला जाणार आहे. तर वाढेफाटा पुलाखाली, कास, ठोसेघरसह शहर परिसरातील नैसर्गिक सौंदर्य उभे केले जाणार आहे. यासाठी 6 कोटीहून अधिक खर्चाचे बजेट ही तयार झाले असून 1 वर्षाच्या आत हा प्रकल्प पूर्ण होणार असल्याचे अभिजित बापट यांनी सांगितले.
सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी शासकीय जागेवर झालेल्या अतिक्रमणाची कुंडली काढून जिल्हाधिकारी, प्रकल्प संचालक, महामार्ग प्राधिकरण, तहसिलदार यांना सादर केली. सदरच्या जागेवरील अतिक्रमण 30 एप्रिल अखेर काढले नाही तर महाराष्ट्र दिनी आमरण उपोषण करणार आहे, तसेच याबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा दिला आहे. त्यानंतर याबाबत ‘तरुण भारत’ ने सडेतोड लिखाण करत या अतिक्रमण आणि तेथील उद्योग चव्हाटय़ावर आणले आहे. त्यामुळे शासकीय यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या असून तहसिलदारांनी मंडलाधिकाऱयांना स्थळ पाहणी करण्यासाठी आदेश दिले आहेत. महावितरणच्या पथकाने मोठी कारवाई करत अनाधिकृतपणे 8 मीटरमधून अनेकांना दिलेली कनेक्शन कट करून वायर जप्त केली. दोषींना चांगलाच आर्थिक दंड आकारणी केली आहे.
प्राधिकरणाची धडक कारवाई सुरु
शासकीय जागेवर अतिक्रमण करून अनेक व्यवसाय सुरू असून काही जणांनी अलीकडे 4 ते 5 वर्षात जीवन प्राधिकरणाकडून नळ कनेक्शन घेतली आहेत. एकाच कनेक्शनवर अनेकजण पाणी भरतात, तर काही कनेक्शन अवैध असल्याचे प्राधिकरणाच्या टीमकडून मंगळवार दि. 26 रोजी धडक तपासणी आढळून आले. प्रत्यक्ष पाहणी करताना प्रभारी उप अभियंता महादेव जंगम, शाखा अभियंता नितीन गायकवाड, जलसेवक विष्णू इंगळे, हातगुंडा पाटील यांनी प्रत्येक कनेक्शनची तपासणी केली. मंगळवार या दिवशी पाणी पुरवठा बंद तर ते अनेक व्यवसाय बंद असल्याने पूर्ण तपासणी करता आली नसल्याने बुधवारी पुन्हा तपासणी करून दोषी असल्याचे निदर्शनास आल्यास कायदेशीर कारवाई करणार असल्याचे उप अभियंता महादेव जंगम यांनी ‘तरुण भारत’ शी बोलताना सांगितले.
ट्रफिक थीम पार्क
नगरपालिकेने सुशोभीकरण करून सौंदर्यात भर घालण्याबरोबर वाहतूक नियमांबाबत प्रबोधन करणारी ‘ट्रफिक थीक पार्क’ बॉम्बे रेस्टॉरंट चौकात होणार आहे. ऐतिहासिक शहराचा लौकिक यामुळे अधिक खुलणार आहे. ट्रफिक थीम पार्कमध्ये वाहतूक नियम, दिशादर्शक माहिती, अपघात मुक्त दळणवळण व्यवस्था निर्माण होण्यासाठी प्रबोधन करणारी पेंटिंग साकारली जाणार असल्याची माहिती मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी दिली.