खेड येथील नगराध्यक्ष चषक राज्यस्तर क्रिकेट स्पर्धा,
प्रतिनिधी / खेड
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिह्यात रात्रीची संचारबंदी लागू असतानाही क्रिकेट सामन्याचे आयोजन केल्याप्रकरणी रहीम युसुफ सहिबोले याच्यावर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोळीबार मैदानात 100 ते 150 जणांनी गैरकायदा जमाव केल्याचेही मंडळ अधिकारी सचिन यशवंत गोवळकर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. मनसेच्यावतीने गोळीबार मैदानात राज्यस्तरीय नगराध्यक्ष चषक क्रिकेट स्पर्धेसाठी प्रशासनाकडून परवानगी दिल्यानंतर 26 फेब्रुवारीला सायंकाळ पासून क्रिकेट स्पर्धा सुरू झाल्या होत्या. ही स्पर्धा 28 पर्यंत सुरू राहणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अटीवर प्रशासनाने परवानगी दिली होती. मात्र आयोजकांनी कोरोना नियम व अटींचे पालन न करता संचारबंदीचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले. शासन नियमांची पायमल्ली करत 100 ते 150 जणांनी बेकायदा जमाव करत सोशल डिस्टसिंगचे पालन न केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे याबाबतचा अधिक तपास सहाययक पोलीस निरीक्षक सुजित गडदे करत आहेत.