विरोधी पक्षनेते लोबो यांचा आरोप : बेकायदेशीर डोंगर कापणी प्रकरण दुसऱयांचे मंत्र्यांच्या कृतीबाबत मुख्यमंत्र्यांना भेटणार
प्रतिनिधी /म्हापसा
नगर नियोजनमंत्री विश्वजित राणे सोशल मीडियावर चुकीचे फोटो टाकून आमच्यावर बेकायदेशीर डोंगर कापण्याचा आरोप करीत आहेत. प्रत्यक्षात आरोप केलेली ती जागा आमची नाही. राणे आम्हाला नाहक आम्हाला ‘टार्गेट’ करीत आहेत. आम्ही आमच्या जमिनीत फार्म केले तर सरकार आमच्या विरोधात गुन्हा नोंदवित आहे, हे सुडाचे राजकारण म्हणावे लागेल, असे सांगून आपण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना भेटणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांनी आपल्या शेतात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
आपण विरोधी पक्षनेता असल्याने आपल्या विरोधात दबावाचे षड्यंत्र रचले आहे. यापुढेही एक एक तक्रारी आपल्या विरोधात नोंदविल्या जातील. राज्यातील व्यावसायिकांना दाबण्याचा हा प्रयत्न असून सर्वांनी आपल्याकडे येऊन प्रथम सेटलमेंट करावे व नंतर पुढे जावे, असा नगर नियोजनमंत्र्यांचा कुटील डाव असावा. त्या हेतूनेच ते आपल्यास लक्ष्य करीत असावे. 2020 साली ओडीपी करण्यात आला तेव्हा भाजपचेच मंत्री व चेअरमन होते, असा आरोपही लोबो यांनी केला आहे.
आम्ही विरोधात बोलायचे नाही काय?
विश्वजित राणे हे व्यवसायिक आहेत. आपल्या मतदारसंघातही त्यांचा व्यवहार आहे, मात्र ते वैयक्तिक कोणता सूड उगवू पाहत आहे हे आपल्यास माहीत नाही. आपण त्यांच्या विरोधात कधी बोललेलो नाही. आपण विरोधी पक्षनेता आहे, तरीही आम्ही काही बोलायचे नाही काय? असा सवाल त्यांनी केला आहे.
ओडीपी भाजपचे मंत्री, चेअरमेननी केला
ओडीपी आम्ही तयार केलेला नाही. भाजपच्याच मंत्र्यांनी तयार केला आहे. फ्रान्सिस सिल्वेरा चेअरमन होते. मंत्र्यांनी जे काही ट्वीट केले ते चुकीचे आहे. जागा एकीकडची आहे आणि तक्रार दुसरीकडची आहे. आज एक मंत्री ओडीपी करतो, तो घरी गेल्यावर नवीन आलेला मंत्री तो ओडीपी बाहेर फेकतो. मडगाव, वास्को, पणजी, म्हापशाचा ओडीपी पुन्हा चालू केला आहे. मात्र कळंगूट, कांदोळी, पर्राचा ओडीपी रोखून धरला आहे. मंत्री राणे काय म्हणू पाहत आहेत, असा सवाल लोबो यांनी केला आहे.
मुख्यमंत्र्यांना याबाबत जाब विचारणार
आम्ही शेती लावतो आणि मंत्री आम्हाला टार्गेट करीत आहेत. पोस्ट घातला आहे एकिकडचा आणि ते दाखवू पाहत आहे की हे कृत्य मायकल लोबो आणि डिलायला लोबो करीत आहेत. मंत्री काय दाखवू पाहतात? म्हणजे प्रथम मंत्र्यांना भेटा व नंतर पुढे चला. सेटलमेंट केल्याशिवाय काहीही होणार नाही हेच दाखवू पाहतात काय? याचा आपण मुख्यमंत्र्यांना जाब विचारणार असल्याची माहिती लोबो यांनी दिली.
राणे गायीपेक्षाही श्रेष्ठ होऊ पाहतात
मंत्री राणे मला टार्गेट करतात, कारण ते स्वतः मोठे मंत्री आहेत. कुणीतरी त्यांना हे करायला लावले असेल. हा भाजप विरुद्ध मायकल लोबोचा खेळ चालला आहे. मी कुणाला दोषी म्हणत नाही. राणे गायीपेक्षाही आपणच श्रेष्ठ होऊ पाहत आहेत, असेही ते म्हणाले.
ती जागा आपली नाही
सर्वे नंबर 10/10 व 10/9 हे सर्वे नंबर आपले नाही. गणेश मातोंडकर यांच्या मुलाने यापूर्वी आपल्या विरुद्ध तक्रार केली होती. त्यांनी शेती लागवडीसाठी माती काढली आहे, त्यांची शेती तिथे आहे असे मातोंडकरांनी म्हटले होते. 2020 ची ही तक्रार आहे. त्यावेळी आपण नगर नियोजन खात्याचा सदस्य व मंत्रीही होतो. मी तसे कधी करणार नाही. आम्ही जे काही कायदेशीर करीत आहोत ते कायदेशीरच आहे. ज्या व्यावसायासाठी येथे बांधकाम केले, व्हीला उभारले ते 60 दिवसात बंद पाडा असे मंत्री राणेनी म्हटले आहे. हा सर्व गोंधळ घातलेला आहे. ज्यांनी कुणी मान्यतेसाठी चलन भरून पैसे भरले आहेत त्यांना एनजीपीडीएचा ना हरकत दाखला मिळत नाही. नवीन ओडीपीला घाला, असे सांगत आहे तर आमचे कळंगूट, कांदोळी, नागवा, पर्रा ओडीपी रोखून ठेवला आहे. म्हणजे त्यांनी पैसे भरले आहे तो 60 दिवस प्रथम तसाच राहिला. तुम्हाला वाटते काही चुकले तर तुमचे माजी चेअरमेन, अधिकारी आहेत त्यांना जान विचारा, असेही ते म्हणाले.
मायकल-डिलायलावर डोंगर कापण्याची तक्रार नोंद
पर्रा येथे बेकायदेशीररित्या भराव घालून जमीन बुजविल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते मायकल लोबो व त्यांच्या पत्नी आमदार डिलायला लोबो यांच्या विरोधात नगर नियोजन खात्यातर्फे गुन्हा नोंदविण्यासाठी म्हापसा पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्या तक्रारीला अनुसरुन मायकल लोबो यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
विश्वजित राणे यांनी शिष्टाचार पाळला का ? : राज्यात उलट-सुलट चर्चा
विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांच्याविरोधात पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात पर्यंतची मजल गाठणाऱया मंत्री विश्वजित राणे यांनी उत्तर गोवा पीडीए अधिकाऱयांना तसे आदेश दिले व ते एवढे करून गप्प बसले नाही तर स्वतः ट्विट संदेशाद्वारे जाहीर केले.
मायकल लोबो आणि त्यांची पत्नी आमदार डिलायला लोबो यांच्या नावाचा उल्लेख देखील केला. मंत्री या नात्याने राणे यांनी खरोखरच शिष्टाचार पाळला का, याबाबत आता राज्यात उलट-सुलट चर्चा होत आहे. मंत्री एखादी कारवाई अधिकाऱयांना करायला लावतो, त्याबाबत सहसा कधी उघडपणे त्याचा डंका पिटवित नसतो. इथे मात्र राणे यांनी स्वतः ट्वीट करून खुद्द विरोधी पक्षनेते आणि त्यांच्या पत्नीचे नाव जाहीर करून शिष्टाचारला फाटा दिला. आपण मंत्र्यापेक्षाही सोशल मीडियाचा एक प्रतिनिधी आहे, अशा पद्धतीचे हे वागणे केले आहे.
यासंदर्भात विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांनी सायंकाळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी फोनवर बोलणे करून विश्वजित राणे यांनी जी वागणूक दिली ती बरोबर नाही व शिष्टाचारला धरून नाही असे सांगितले. विश्वजित राणे यांना यांच्यावर कारवाई करण्यासाठी एवढी घाई का लागावी, असा सवालही विरोधी पक्षनेत्याने केला. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात आपण लक्ष घालतो असे सांगितले.
मुख्यमंत्री अनभिज्ञ…
दरम्यान प्राप्त माहितीनुसार विरोधी पक्षनेत्याच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचा आदेश आपल्या अधिकाऱयांना देण्यापूर्वी नियमानुसार मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची परवानगी घेणे आवश्यक होते. परंतु त्यांनी तशी परवानगी देखील घेतलेली दिसत नाही. त्यामुळे मंत्री विश्वजित राणे त्यांचे वागणे सदोष असल्याचे दिसून येते. राजकीय सिंघम बनण्याची त्यांना घाई लागल्याचे दिसून येते.