हिंदी चित्रपटातील अभिनेत्री किंवा नटय़ांची जीवनशैली हा सर्वसामान्यांचा अतिशय आकर्षणाचा आणि चर्चेचा विषय आहे. त्यांचं खाणंपिणं, नाश्ता, जेवण, कपडेलत्ते इत्यादींचं अनुकरण (आपल्याला परवडत नसलं तरी) करण्याचा अनेकांचा प्रयत्न असतो. तर काही लोकप्रिय अभिनेत्रींच्या दिवसाचा प्रारंभ कोणत्या पेयानं होतो, त्याविषयीची ही महिती आहे.
अनुष्का शर्माचं म्हणणं असं की शरीराला प्रमाणबद्ध राखायचं असेल तर ‘एल्डरफ्लॉवर टी’ (एक प्रकारचा चहा) पिणं अनिवार्य आहे. तिची सकाळ याच पेयानं सुरु होते. हे पेय औषधीही असल्याचं तिचं म्हणणं आहे. या पेयानं सायनिसायटिस, सर्दी, फ्ल्यू, मधुमेह आदी विकार दूर राहतात, असं ती सांगते. (कदाचित कोरोनाही होत नसावा, पण खात्री नाही).
सोनम कपूर फिटनेस बद्दल प्रसिद्ध मानली जाते. ‘बबल टी’ हे तिचं सकाळचं पेय आहे. यालाच पर्ल मिल्क टी असंही म्हणतात. या चहात साबुदाणे टाकले जातात. तसंच बर्फाचे काही खडेही टाकले जातात. हा प्रकार भारतात विशेष लोकप्रिय नाही. मात्र हा चहा वजन नियंत्रणात राखण्यास सहाय्यभूत होतो असं म्हणतात. खरं खोटं सोनमलाच माहित. हा चहाही आपल्याला नेहमीच्या पावसाळी विकरांपासून दूर ठेवतो असा आपला अनुभव असल्याचं ती म्हणते.
तापसी पन्नू या गाजलेल्या अभिनेत्रीचं काकडीच्या रसावर पेम आहे. सकाळी उठल्यानंतर ती हे पेय पिते. हा केवळ काकडीचा रस नसतो. तर त्यात ओवा आणि सफरचंदाचा रस यांचं मिश्रण असतं. हा रस बनवायला सोपा असल्याचं सांगितलं जातं. या पेयग्नात ती अर्ध्या लिंबाचा रसही टाकते. हे पेयही वजन नियंत्रणात ठेवण्यास तसेच त्वचेचा तजेला टिकवून धरण्यास सक्षम आहे.
मलाईका अरोराची सकाळ ग्रीन स्मूदीनं सुरु होते. हे पेय ती केवळ सकाळीच नव्हे तर मधेअधे केव्हाही प्राशन करते. ही अभिनेत्री रोजच्या रोज व्यायामासाठी प्रसिद्ध आहे. हे पेय ती नारळाचं पाणी आणि सफरचंदाचा रस यांच्या मिश्रणात इतर अनेक आरोग्यवर्धक पदार्थ टाकून बनविते, असं म्हणतात.
एकंदर, या अभिनेत्री आपली शरीरयष्टी आणि शरीरप्रकृती यासंबंधात अतिशय जागृत आणि जागरुक असतात. याचं अनुकरण साऱयांनी करावं. त्यांच्याकडून घेण्यासारखं एवढंच असतं असंही काही चेष्टेखोर लोक म्हणतात.