प्रतिनिधी /पणजी
पूर्व प्राथमिक (प्री प्रायमरी) नर्सरी शाळा प्रवेशासाठी मुलांचे वय 6 महिन्यांनी शिथील करण्यात आले असून तशा आशयाचे परिपत्रक शिक्षण संचालनालयाने जारी केले आहे. ते सर्व पूर्व – प्राथमिक शाळांना पाठविण्यात आले असून त्यानुसार आता दोन वर्षे सहा महिन्यांच्या (अडीच वर्ष) मुलांना नर्सरीत प्रवेश मिळणार आहे. सदर प्रवेशासाठी आता किमान वय अडीच वर्षे करण्यात आले आहे. यापूर्वी ते वय तीन वर्षांचे होते.
त्या तीन वर्षाच्या अटीमुळे अनेक लहान मुलांचा नर्सरी प्रवेश एक – दोन ते पाच – सहा महिन्यांमुळे चुकायचा आणि त्यांना प्रवेश मिळत नव्हता. त्याची दखल घेऊन गोवा दमण – दिव शालेय – शिक्षण कायदा 1984 मध्ये उपरोक्त शिथीलतेसाठी थोडी दुरुस्ती करण्यात आली आहे. या परिपत्रकामुळे आता अडीच वर्षे झालेल्या मुलांना नर्सरीत आरामात प्रवेश मिळणार असून त्यांची 3 वर्षे पूर्ण होईपर्यंत पालकांना थांबण्याची गरज नाही. नवीन शैक्षणिक वर्ष 2022-23 पासून त्याची कार्यवाही होणार आहे.