दिमतीला 4 कार्यकारी अध्यक्षही नियुक्त
चंदीगढ / वृत्तसंस्था
काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी नवज्योतसिंग सिद्धू यांची पंजाब प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. ते सुनील जाखड यांची जागा घेतील. ही नियुक्ती हायकमांडने जाहीर केली असून सोबत चार कार्यकारी अध्यक्षांचीही नेमणूक करण्यात आली आहे. संगतसिंग गिल्जियान, सुखविंदरसिंग डॅनी, पवन गोयल आणि कुलजितसिंग नागरा यांचा त्यात समावेश आहे. पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्या स्वाक्षरीने याबाबतचे पत्र जारी करण्यात आले. दरम्यान, नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देताना कुलजितसिंग नागरा यांना सिक्कीम, नागालँड आणि त्रिपुराच्या एआयसीसीच्या अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे.
नवज्योतसिंग सिद्धू हे गेल्या काही दिवसांपासून नाराज होते. तसेच मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याशीही त्यांचे मतभेद निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर त्यांची नाराजी काँग्रेसकडून दूर केली जाईल, अशी शक्मयता होती. तसेच त्यांच्यावर पंजाब राज्यात मोठी संघटनात्मक जबाबदारी सोपविण्यात येईल, अशी चर्चा होती. आता त्यांना पंजाब प्रदेशचे अध्यक्षपद सोपविण्यात आल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. शुक्रवारीच सिद्धू यांनी काँग्रेस हायकमांड सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. यावेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि पंजाबचे प्रभारी हरिष रावत उपस्थित होते. या भेटीनंतर हरिष रावत यांनी पंजाबचा दौरा करत कॅप्टन अमरिंदर सिंग यांची भेट घेत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता.
सिद्धू यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष सोपविण्यास पंजाब काँग्रेसमधील एका गटाचा विरोध होता. राज्यातील काँग्रेस खासदारांनी रविवारी राज्यसभा सदस्य प्रतापसिंग बाजवा यांच्या निवासस्थानी बैठक घेतली होती. या बैठकीत 11 पैकी 9 खासदार सहभागी झाले. त्यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला होता. सिद्धू यांची पक्ष संघटनेवर कुठलीही पकड नसल्याचा दावा या बैठकीत करण्यात आला होता. तरीही हायकमांडनी सिद्धू यांच्यावर विश्वास दाखवत प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवली आहे.