पत्नी अदितीचा भाजपप्रवेश, काँग्रेसने नाकारले तिकीट
उत्तरप्रदेशात रायबरेली शहर मतदारसंघाच्या आमदार अदिति सिंह यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्याचा फटका त्यांचे पती अंगद सिंह यांना पंजाबमध्ये बसला आहे. र्कांग्रेसने अदिति सिंह यांच्या भाजपप्रवेशानंतर पंजाबच्या नवांशहर मतदारसंघात त्यांचे पती अंगद सिंह यांना उमेदवारी नाकारली आहे. अंगद यांनीही आता बंडखोरीचा सूर पत्करला असून अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे.
अंगद सिंह नवांशहर तर अदिति सिंह उत्तरप्रदेशच्या रायबरेली मतदासंघातून काँग्रेसच्या तिकीटावर विजयी होत पहिल्यांदा आमदार झाले होते. दोघांनीही 2017 मध्ये सक्रीय राजकारणात पदार्पण केले होते. परंतु आता दुसरी निवडणूक अदिति सिंह भाजपकडून लढवत आहेत. तर निवडणूक तोंडावर असताना काँग्रेसने उमेदवारी नाकारल्याने अंगद सिंह यांनी अपक्ष म्हणून मैदानात उतरण्याची घोषणा केली आहे.
समर्थकांना पाचारण
अंगद यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची घोषणा केल्यावर नवांशहरमध्ये एक कार्यक्रम आयोजित करत स्वतःच्या सर्व समर्थकांना बोलाविले आहे. यात नवांशहर मतदारसंघातील सरपंच तसेच काँग्रेसचे पदाधिकारी सामील आहेत. अदिति यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असला तरीही अंगद यांनी काँग्रेसमध्येच राहणार असल्याची भूमिका घेतली होती. अंगदच्या समर्थकांनी सोनिया गांधी तसेच राहुल गांधींना पत्र लिहून त्यांनाच उमेदवारी देण्याची मागणी केली होती. परंतु पक्षश्रेष्ठींनी याकडे दुर्लक्ष करत अंगद यांना उमेदवारी नाकारली आहे.
कॅप्टन समर्थकाला तिकीट
नवांशहरमध्ये काँग्रेसने सतवीर सिंह सैनी उर्फ पाली यांना तिकीट दिले आहे. कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या निकटवर्तीयाला उमेदवारी देण्यात आल्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे.