कोविड-19 चा संसर्ग हवेतूनही पसरण्याची शक्यता असते, असे जागतिक आरोग्य संघटनेने नुकतेच म्हटले आहे. हवेतून पसरणारे अनेक संसर्गजन्य आजार आजही आपल्यात आहेत. कोविड-19 हवेतून पसरतो, असे स्पष्ट करणारी संशोधने झाली असली, तरी याविषयी तज्ञांमध्ये अद्याप एकमत झालेले नाही; परंतु जर खरोखर तसे असेल, तर घाबरून जाण्याऐवजी आपण काय करू शकतो आणि काय करायला हवे, हे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
आपल्याला होणारे संसर्गजन्य आजार अनेक मार्गांनी पसरत असतात. संसर्ग असणारे पाणी किंवा खाद्यपदार्थ सेवन केल्याने, डास किंवा किडय़ांच्या दंशाने, रोगजंतू असलेल्या वस्तूला स्पर्श केल्याने किंवा संसर्ग पसरलेल्या हवेत श्वास घेण्यानेसुद्धा आपल्याला हे आजार होतात.
- वास्तविक, या मार्गांनी पसरणारे रोगजंतू, जीवाणू आणि विषाणू निरोगी शरीरात शिरून आजार उत्पन्न करतात. हवेद्वारे जे रोग पसरतात, ते अत्यंत घातक आणि झपाटय़ाने पसरणारे मानले जातात. कोविड-19 हा आजारसुद्धा हवेतून पसरत असण्याची शक्यता आहे, असे नुकतेच जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) म्हटले असून, त्या दृष्टीने आपल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये बदलही केले आहेत.
- हवेद्वारे पसरणारे आजार अधिक संसर्गजन्य मानले जाण्याचे आणखी एक कारण म्हणजे, या आजारांचे वाहक ठरणारे रोगजंतू हवेतसुद्धा अनेक तास जिवंत राहू शकतात आणि आजारांचा फैलाव करण्यास सक्षम राहू शकतात.
- हा संसर्ग एअरोसोलच्या माध्यमातून पसरते. या एअरसोलचा व्यास पाच मायक्रॉनपेक्षा कमी असतो.
- रेस्परेटरी ड्रॉपलेट्स म्हणजे नाकातोंडावाटे उडणार्या शिंतोडय़ांचा व्यास पाच ते दहा मायक्रॉन असल्यामुळे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे ते एक मीटरपेक्षा अधिक अंतर पार करू शकत नाहीत आणि काही मिनिटांतच जमिनीवर पडतात. परंतु जेव्हा हवेच्या माध्यमातून संसर्ग पसरतो तेव्हा एअरोसोल छोटे आणि हलके असल्यामुळे अधिक अंतर पार करू शकतात तसेच अधिक काळ हवेत राहू शकतात.
- हवेमुळे पसरणार्या आजारांचा संसर्ग रोगग्रस्त व्यक्ती शिंकल्याने, खोकल्याने, नाक स्वच्छ करण्याने किंवा खाकरा थुंकल्यामुळे पसरतो. परंतु जेव्हा संसर्गग्रस्त व्यक्ती न शिंकता, न खोकता, न थुंकतासुद्धा केवळ श्वास सोडते, बोलते, गाणे म्हणते किंवा हसते त्याही वेळी विषाणू पसरू शकतात, त्यामुळे हवेद्वारे पसरणारे आजार अधिक घातक बनतात. हवेद्वारे पसरणार्या आजारांची काही लक्षणे एकसारखी असतात. परंतु संसर्गाचा प्रकार आणि गांभीर्य या आधारे काही विशेष लक्षणेही दिसून येतात.
- सामान्य लक्षणांमध्ये खोकला, शिंका, छाती अवघडणे, नाक वाहणे, घशात खवखव, श्वासनलिका सुजणे, डोकेदुखी, अंगदुखी, भूक न लागणे आणि ताप येणे या लक्षणांचा समावेश होतो.
- हवेद्वारे पसरणार्या अधिकांश रोगांवर आराम करणे हाच सामान्य उपचार आहे. अशा व्यक्तींनी पाणी आणि द्रवपदार्थ अधिक प्रमाणात सेवन करायला हवेत. तरीही फरक न पडल्यास जीवाणूरोधी किंवा विषाणूरोधी औषधे दिली जातात. प्रकृती गंभीर बनल्यास रुग्णालयात दाखल करावे लागते.
- मार्च 2020 मध्ये डब्ल्यूएचओने कोविड-19 हा एक श्वसनसंस्थेचा संसर्ग (रेस्परेटरी इन्फेक्शन) आहे, असे जाहीर केले होते.
- रुग्णाच्या नाकातोंडावाटे उत्सर्जित तरल पदार्थ किंवा ड्रॉपलेट्सच्या माध्यमातून तो पसरतो; हवेतून नव्हे, असेही डब्ल्यूएचओने स्पष्ट केले होते. हे ड्रॉपलेट्स म्हणजेच शिंतोडे वेगवेगळ्या आकाराचे असू शकतात.
- परंतु सहा जुलै रोजी 32 देशांच्या 239 तज्ञांनी आणि संशोधकांनी एका पत्राच्या माध्यमातून कोरोना विषाणू हवेद्वारे पसरत असल्याचे पुरावे अधोरेखित केले.
- माध्यमातून होऊ शकतो.
- नेचर नावाच्या नियतकालिकात प्रकाशित झालेल्या वृत्तांतानुसार, कोरोना विषाणूच्या एअरोडायनॅमिक मॉडेलविषयी एक संशोधन करण्यात आले.
- संशोधनादरम्यान विषाणूच्या रायबोन्यूक्लिक ऍसिडचे (आरएनए) मोजमाप घेण्यात आले. त्याद्वारे असे आढळून आले की, एअरोसोलच्या आकारातही विषाणू असतात. संसर्गग्रस्त रुग्णांच्या योग्य प्रकारे व्हेन्टिलेट केलेल्या खोल्यांमध्ये किंवा आयसोलेशन सेंटरमध्ये हे विषाणू कमी प्रमाणात असतात; परंतु संसर्गग्रस्तांनी वापरलेल्या स्वच्छतागृहांमध्ये मात्र ते मोठय़ा संख्येने असतात.
- एअरोसोल्स हे आपल्या उत्सर्जनाच्या ठिकाणापासून दोन मीटर अंतरापर्यंत संसर्ग पसरवू शकतात. त्यामुळे आता माणसा-माणसात सहा फूट अंतर राखणे आवश्यक मानले जात आहे. विशेषतः बंद खोलीत हे अंतर कसोशीने पाळले गेले पाहिजे.
- सर्वसाधारण मास्कपेक्षा एन-95 मास्क अधिक उपयुक्त ठरू शकतो. घर, कार्यालय किंवा सार्वजनिक शौचालयांत एअर प्युरीफायर बसविणे योग्य ठरेल. कोविड-19 हा हवेतून पसरणारा आजार असल्यास संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या बरीच वाढण्याची शक्यता आहे.
हवेतून पसरणार्या आजारांना एअरबोर्न डिसीज म्हणतात. जेव्हा रोग उत्पन्न करणारे जीवाणू (बॅक्टेरिया) किंवा विषाणू (व्हायरस) हवेच्या माध्यमातून एका रुग्णाकडून दुसर्या निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात, तेव्हा निरोगी व्यक्तीच्या शरीरात आजार पसरण्याची शक्यता असते.
डब्ल्यूएचओच्या नव्या सूचना
- सोशल डिस्टन्सिंगचे कसोशीने पालन करावे. कोणत्याही व्यक्तीपासून दोन मीटर म्हणजे सहा फूट दूर राहावे.
- घरात आणि कार्यालयात हवा खेळती राहील, याची व्यवस्था करावी.
- खोकताना, शिंकताना टिश्यू पेपर किंवा रुमालाचा वापर करावा.
- साबण आणि पाण्याने सतत हात धुवावेत.
- आजारी लोकांच्या संपर्कात अजिबात येऊ नये.
- स्वतःच्या चेहर्याला वारंवार हात लावणे टाळावे.
- बंद खोलीत किंवा बंदिस्त ठिकाणी एकत्र जमणे टाळावे.
- आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा अवलंब करावा.
- किमान सहा ते आठ तास झोप घ्यावी आणि संतुलित आहार घ्यावा.
- द्रवपदार्थ आणि पाण्याचे सेवन वाढवावे.
- तणावावर नियंत्रण ठेवावे.
- नियमित व्यायाम करावा.
– प्रा. विजया पंडित