मुंबई / प्रतिनिधी
मनसेचे महाअधिवेशन आज (गुरुवार) गोरेगाव येथील नेस्को मैदानात होणार आहे. या अधिवेशनानंतर राज ठाकरे आपल्या पक्षाची नवी दिशा ठरवतील. विशेष म्हणजे मनसेच्या झेंडय़ाचा रंगही बदलणार असून महाअधिवेशनात हा नवा झेंडा सगळ्यांच्या समोर येईल. दरम्यान, शिवसेनेची हिंदुत्वाबाबतची बदललेली भूमिका यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता हिंदुत्वाचा मुद्दा रेटून धरण्याचा विचार केला असल्याचा खुलासा अधिवेशनामध्ये होण्याची शक्यता आहे. या महाअधिवेशनाचे उद्घाटन सकाळी 9 वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर पक्षाचे नेते तसेच इतर मान्यवर मनसेच्या सर्व पदाधिकाऱयांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर दुपारच्या सत्रात पक्षाचे काही नवीन ठराव मांडण्यात येणार असून त्याला मंजुरी दिली जाणार आहे. तसेच कार्यकर्त्यांनी काही कार्यक्रम ठरवून दिले जातील. त्यानंतर राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत.