2021 मध्ये भारतात 2.57 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक : वेंचर कॅपिटलचे माध्यम
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतामध्ये मागच्या वर्षी वेंचर कॅपिटल (व्हीसी)च्या माध्यमातून नव्या उद्योग उपक्रमांसाठी गुंतवणूक विक्रमी टप्प्यावर पोहोचली असल्याची माहिती केपीएमजीच्या एका अहवालामधून दिली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार 2021 मध्ये भारतात 2.57 लाख कोटी रुपयांची या क्षेत्रात गुंतवणूक झाल्याची माहिती आहे.
डिसेंबर तिमाहीच्या दरम्यान आशिया-प्रशांतच्या 10 मोठय़ा व्यवहारांपैकी भारतात दोन व्यवहार झाले आहेत. चौथ्या तिमाहीमध्ये सर्वाधिक गुंतवणूक फिनटेक क्षेत्रात झाली आहे. हेल्थकेअर, बी टू बी (बिजनेस टू बिजनेस) सर्व्हिसेस आणि डायरेक्ट टू कंझ्युमर प्लॅटफॉर्ममध्ये झालेली गुंतवणूक ही अनुक्रमे दुसऱया, तिसऱया आणि चौथ्या स्थानी राहीली आहे.
गेल्या म्हणजेच 2021 मोठय़ा प्रमाणात स्टार्टअप कंपन्यांनी आपले व्यवसाय सुरू केले. 2021 च्या दरम्यान देशामध्ये 44 स्टार्टअप्सना युनिकॉर्नचा दर्जा मिळाला आहे. चालू वर्षात ही स्थिती आणखी सुधारणार असल्याचे संकेत आहेत. यासोबतच डिसेंबर 2022 पर्यंत कमीत कमी 50 नवीन स्टार्टअप्स युनिकॉर्न कंपन्या अस्तित्वात येतील, असा अंदाज बांधला जात आहे.
वेंचर कॅपिटल म्हणजे काय...
वेंचर कॅपिटल अंतर्गत वित्त पुरवठय़ाची सोय होते. यामध्ये गुंतवणूकदार स्टार्टअप कंपन्या किंवा छोटय़ा व्यावसायिकांना निधी पुरवतात. दीर्घकालीन विकासाचा अंदाज बांधून ही गुंतवणूक केली जाते. ही गुंतवणूक अर्थात गुंतवणूक बँका व इतर वित्त संस्थांकडून होते.
व्हीसी गुंतवणुकीत निम्मा हिस्सा अमेरिकेचा
मागील तिमाहीत संपूर्ण जगात व्हीसी गुंतवणुकीचा निम्मा हिस्सा हा अमेरिकेत झालेला दिसला आहे. देशात मजबूत स्थिती
भारतामध्ये मागील दोन वर्षाच्या दरम्यान वरील उद्योगाशी संबंधीत गुंतवणूकीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.