दिवसभरात देशात 15 हजारांखाली रुग्ण
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात बुधवारी सकाळपर्यंतच्या 24 तासात 15 हजारांहून कमी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मात्र, डिस्चार्ज मिळणाऱयांची संख्या नव्या रुग्णांपेक्षा कमी असल्याने सक्रिय रुग्णांमध्ये किंचित वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात 13 हजार 123 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
देशात आतापर्यंत 1 कोटी 11 लाखांहून अधिक जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. गेल्या 24 तासात देशात 14 हजार 989 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तसेच देशात 98 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशभरात 1 लाख 70 हजार 126 सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत देशात एकूण 1 लाख 57 हजार 346 बाधितांचा मृत्यू झाला आहे. देशात पॉझिटिव्ह रुग्णांचा एकूण आकडा आता 1 कोटी 11 लाख 39 हजार 516 वर पोहोचल्याची माहिती बुधवारी सकाळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जारी करण्यात आली. देशात आतापर्यंत 1 कोटी 8 लाख 12 हजार 44 रुग्ण उपचाराअंती बरेही झाले आहेत.