उच्च शिक्षणमंत्री डॉ. सी. एन. अश्वथनारायण यांची माहिती
प्रतिनिधी /बेंगळूर
नवे राष्ट्रीय शिक्षण धोरणांतर्गत विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेला सोमवार दि. 23 ऑगस्टपासून चालना देण्यात येईल. तसेच 1 ऑक्टोबरपासून वर्ग सुरू होतील, अशी माहिती उच्च शिक्षणमंत्री डॉ. सी. एन. अश्वथनारायण यांनी दिली. संपूर्ण देशातच नवे शिक्षण धोरण जारी करीत असलेले कर्नाटक पहिले राज्य असून विद्यार्थ्यांना नव्या धोरणाचा अभ्यास करण्यास संधी दिली जात आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रीय शिक्षण धोरण जारी करण्याबाबत बेंगळुरात आयोजित व्हर्च्युअल कार्यक्रमात ते बोलत होते.
मंत्री अश्वथनारायण पुढे म्हणाले, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेद्र प्रधान व्हर्च्युअलद्वारे विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेला चालना देणार असून या कार्यक्रमात मुख्यमंत्री बसवराज बोम्माईदेखील सहभागी होणार आहेत. अधिकृतपणे सोमवारपासूनच उच्च शिक्षण विभागाशी संबंधित सर्व कॉलेज, शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. हे विद्यार्थी राष्ट्रीय शिक्षण धोरणांतर्गत आपल्या आवडीच्या विषयांचा अभ्यास करणार असून विद्यार्थ्यांना ऑक्टोबरपासून वर्गांना उपस्थित राहणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
याचबरोबर सोमवारीच राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या ‘एकिकृत विश्वविद्यालय आणि कॉलेज व्यवस्थापन व्यवस्थे’च्या विद्यार्थी नावनोंदणी प्रणालीचेही लोकार्पण करण्यात येणार आहे. सरकारी महाविद्यालयांसह अनुदानित आणि खासगी शाळांमध्येही या प्रणालीद्वारेच विद्यार्थी नावनोंदणी करू शकतील. ही संपूर्ण प्रकिया वेब आधारित ऑनलाईनद्वारे होणार आहे. कोणता विद्यार्थी कोणत्या महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे, कोणता कोर्स निवडला आहे आदी विषयांची संपूर्ण माहिती त्या-त्या विश्वविद्यालयात असते, असेही मंत्री अश्वथनारायण म्हणाले.
यूजीसीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार 1 ऑक्टोबरपासून वर्ग सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हे सर्व विश्वविद्यालयांना लागू असेल. तत्पूर्वी, विद्यार्थ्यांनी संबंधित संस्थेत नावनोंदणी प्रक्रिया पूर्ण करून अभ्यासक्रम निवडणे आवश्यक आहे. सर्व प्रक्रिया तंत्रज्ञानाद्वारे होणार असल्याने विलंब होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी विनोद कृष्णमूर्ती, प्रशांत जाधव आदी उपस्थित होते.