वाळवा / वार्ताहर
पलुस तालुक्यातील नागठाणे येथे उत्तरवाहिनी कृष्णा नदीपात्रात नागठाणे बंधारा येथे बुधवारी सकाळी एक मगर मृत अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली. ही मगर नर जातीची असुन ती ११ फुट लांबीची आहे. शवविच्छेदनात सडलेल्या अवस्थेत असल्याने तिच्या मृत्यूचे नेमके कारण शोधणे अशक्य आहे असे डॉ. कदम यांनी सांगितले आहे.
याबाबत वन विभागाला कळविल्यानंतर पलुस कडेगावच्या वनक्षेत्रपाल पल्लवी चव्हाण, वनपाल मारुती ढेरे, वनरक्षक शहाजी ठवरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. वन विभागाकडून स्थानिक चौकशीनंतर मृत मगरीचा पंचनामा करून ती पलुस येथे शवविच्छेदनासाठी नेली, आंधळी फाटा येथील माळावर पलुस तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. ऋतुराज कदम यांनी सदर मगरीचे शवविच्छेदन केले. तरीही तिच्यावरील जखमांवरून दोन नरांमधील संघर्षातून हा मृत्यू झाला असल्याची शक्यता डॉ. कदम यांनी व्यक्त केली आहे.
१०-११ फूट एवढ्या लांबीच्या मगरी दिसत असल्यामुळे नागठाणे आणि वाळवा परिसरामध्ये खळबळ उडाली असून, नागठाणे वाळवा व कृष्णा नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणावर मगरींचा वावर आहे. अनेक दिवसापासून मगरीचा वावर असल्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांना धोका असून, या मगरींना सुरक्षित स्थळी पाठवावे. अशी मागणी अनेक दिवसांपासून आहे, परंतु वनखात्याने कोणतेही पाऊल न उचलल्याने नदीकाठचा धोका कायम आहे.