प्रतिनिधी /पणजी :
नागरिकत्व कायद्याला समर्थन देण्यासाठी भाजपतर्फे पणजीत आज शुक्रवारी भव्य रॅली काढण्यात येणार असून भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा या सभेत मार्गदर्शन करणार आहेत. आझाद मैदानावर होणाऱया सभेला 26 ते 27 हजार कार्यकर्त्यांची उपस्थिती असणार आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष व खासदार विनय तेंडुलकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
ईडीसी पाटो येथून रॅलीला प्रारंभ होणार आहे. या समर्थन रॅलीचे नेतृत्व नड्डा करतील. आझाद मैदानावर याचे जाहीर सभेत रुपांतर होणार आहे. नागरिकत्व कायदा लोकसभा व राज्यसभेतही बहुमताने संमत करण्यात आला आहे. राज्यसभेत भाजपचे बहुमत नसतानाही विधेयकाच्या बाजूने 124 मते पडली. तर विरोधात 99 मते पडली. एआयडीएमके, जनता दल, अकाली दल आसाममधील स्थानिक पक्ष यांनीही समर्थन दिले. काँग्रेस व अन्य काही पक्षानी विरोध केला आहे. अमेरिका, इंग्लंडमधील लोकही या कायद्याचे समर्थन करतात, असे सांगून या सभेत लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
भाजप प्रदेशाध्यक्षाची निवड लवकरच
गोवा प्रदेश भाजप अध्यक्षाची लवकरच निवड होणार आहे. गटसमित्या, दोन जिल्हा समित्या यांचे गठन झालेले आहे. निवडणूक प्रमुख म्हणून गोविंद पर्वतकर यांनी काम पाहिले. सर्व समित्यांची बिनविरोध निवड झाली आहे. 38 मंडळ समित्या गठीत करण्यात आल्या आहेत असेही तेंडुलकर यांनी सांगितले.
काँग्रेसच्या पणजी मंडळ अध्यक्षानी भाजपात प्रवेश केला. येत्या काळात ताळगाव, पुंभारजुवा या मतदारसंघातील गटसमित्यांचे पदाधिकारी भाजपात प्रवेश करणार असल्याचे ते म्हणाले. यावेळा उपाध्यक्ष सदानंद तानावडे, गोविंद पर्वतकर, दामु नाईक यांची उपस्थिती होती.