सलामीच्या सामन्यात युकीचा पराभव, नागलची होमग्रेनवर मात
वृत्तसंस्था / हिलेरॉड (डेन्मार्क)
येथे सुरू असलेल्या डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेच्या विश्व गट 1 प्ले ऑफ लढतीत भारताने डेन्मार्कशी 1-1 अशी बरोबरी साधली आहे. या लढतीतील पहिल्या एकेरी सामन्यात डेन्मार्कच्या रुनेने भारताच्या युकी भांब्रीचा पराभव करत आपल्या संघाला आघाडीवर केले. पण त्यानंतर दुसऱया एकेरी सामन्यात भारताच्या सुमीत नागलने डेन्मार्कच्या होमग्रेनचा पराभव करत आपल्या संघाला बरोबरीत नेले. आता या लढतीत शनिवारी उशिरा दुहेरीचा सामना होणार असून त्यानंतर परतीचे एकेरी सामने खेळवले जातील.
या लढतीतील पहिल्या एकेरीच्या सामन्यात डेन्मार्कचा टॉप सिडेड होल्गेर रुनेने भारताच्या युकी भांब्रीचा 6-2, 6-2 अशा सरळ सेट्समध्ये 58 मिनिटांच्या कालावधीत पराभव करत आपल्या संघाचे विजयाचे खाते उघडले. या लढतीत 19 वर्षीय रुनेने पहिल्या आणि दुसऱया सेट्समध्ये प्रत्येकी दोनवेळा भांब्रीचा सर्व्हिस भेदली. युकी भांब्रीला या सामन्यामध्ये आपली सर्व्हिस अधिकवेळ राखती आली नाही. त्यांनी चारवेळा दुहेरी चुका केल्या. सदर लढत येथील इनडोअर हार्ड कोर्टवर खेळवली जात आहे.
या लढतीतील दुसऱया एकेरी सामन्यात भारताचा सुमीत नागलने दर्जेदार खेळ करत डेन्मार्कच्या ऑगेस्ट होमग्रेनचा 4-6, 6-3, 6-4 अशा सेट्समध्ये पराभव केला. नागलच्या विजयामुळे भारताला या लढतीत डेन्मार्कशी 1-1 अशी बरोबरी साधता आली. 25 वर्षीय नागल हा एटीपीच्या मानांकनात 506 स्थानावर आहे. डेन्मार्कचा होमग्रेन एटीपीच्या मानांकनात 484 व्या स्थानावर आहे. होमग्रेनने आपल्या बेसलाईन खेळाच्या जोरावर पहिला सेट 6-4 असा जिंकला पण त्यानंतर नागलने आपल्या डावपेचात बदल करत तसेच अचूक सर्व्हिसच्या जोरावर दुसऱया सेट्स 6-3 असा जिंकून बरोबरी साधली. या दुसऱया सेट्समध्ये नागलने 5-2 अशी आघाडी मिळवली होती. या सेटमध्ये होमग्रेनकडून किमान दोनवेळा दुहेरी चुका झाल्याने नागलने हा सेट जिंकला. तिसऱया आणि शेवटच्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी आपली सर्व्हिस अधिक वेळ राखण्यात यश मिळवले होते. नागलने व्हॅलिज फटक्यावर भर देत शेवटी फोरहँड फटक्यावर आपला विजय नोंदवला. या सामन्यामध्ये नागलच्या परतीच्या फटक्यावर होमग्रेनकडून वारंवार चुका झाल्याने त्याला हा सामना गमवावा लागला.