स्वराध्या फाऊंडेशनच्या राज्य एकांकिका स्पर्धेचे उद्घाटन
वार्ताहर / मालवण:
स्वराध्या फाऊंडेशनने राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या माध्यमातून मालवणात नाटय़चळवळ उभारली आहे. ही नाटय़चळवळ अशीच अविरत सुरू ठेवावी, असे आवाहन जि. प. सदस्य हरी खोबेरकर यांनी येथील मामा वरेरकर नाटय़गृह येथे स्वराध्या फाऊंडेशनच्या मामा वरेरकर करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी केले.
स्वराध्या फाऊंडेशनच्या मामा वरेरकर करंडक राज्य एकांकिका स्पर्धेचे यंदाचे पाचवे वर्ष आहे. उद्घाटनप्रसंगी ज्येष्ठ अभिनेते संजय मोने, अभिनेते क्षितीज झावरे, अध्यक्ष सुशांत पवार, उपाध्यक्ष गौरव ओरसकर, सचिव अभय कदम, मुकेश बावकर, संध्या परुळेकर, गौरीश काजरेकर, शांती पटेल, महेश काळसेकर, दीपक जाधव आदी उपस्थित होते.
हरी खोबेरकर म्हणाले, एखादी चळवळ जेव्हा सुरू होते, तेव्हा त्या चळवळीच्या पाठीशी ठराविक लोक असतात. कालांतराने त्या चळवळीचे स्वरुप विस्तारत जाते. अनेक माणसे चळवळीशी जोडली जातात. स्वराध्याची नाटय़चळवळही नजीकच्या काळात विस्तारणार आहे. मालवणला नाटय़चळवळीची पार्श्वभूमी आहे. मालवणी नटसम्राट मच्छिंद्र कांबळी यांच्या नावाने कुडाळ येथे नाटय़गृह सुरू होणार आहे. त्यामुळे मालवणप्रमाणेच कुडाळ तालुक्यातील नाटय़रसिकांनाही नाटकांचा आनंद लुटता येणार आहे. मालवणसारख्या शहरात स्वराध्याने राबविलेल्या एकांकिका स्पर्धेचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे अभिनेते व लेखक क्षितीज झावरे म्हणाले. प्रास्ताविक सुशांत पवार यांनी केले. सुत्रसंचालन गौरव ओरसकर यांनी, तर आभार गौरीश काजरेकर यांनी मानले.