दिल्ली येथील सानिया व तानिया करणार व्यवस्था
वाळपई/प्रतिनिधी
नाणूस येथील गोशाळेत अनेक भटकी गुरे व दुखापत झालेल्या गुरांवर उपचार करण्यात येतात. मात्र काही गुरे ही रस्त्यावरील अपघातामुळे गंभीर जखमी होत असतात. अशाच प्रकारे गेल्या काही महिन्यापासून शिवा हा बैल व गौरी ही गोमाता एक पाय निकामी झाल्यामुळे अत्यंत बिकट अवस्थेत या गोशाळेमध्ये दिवस काढीत होती. दिल्ली येथील सानिया व तानिया या दोघा महिला गोभक्तांनी या गुरांवर उपचार करण्याचे निश्चित केले आहे. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून त्यांना कुत्रिम दुसरा पाय बसविण्यात येणार आहे. त्यांनी आज नाणूस येथील जय श्रीराम गोशाळेमध्ये भेट देऊन शिवा व गौरीची सविस्तरपणे पाहणी केली. यावेळी त्यांनी पायाची मोजमाप घेतले असून कुत्रिम पाय तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर शिवा व गौरी या गुरांना कुत्रिम पाय बसविण्यात येणार आहे, अशी माहिती सानिया व तानिया यांनी दिली.
कुत्रिम पायाची निर्मिती दिल्ली येथे करण्यात येणार आहे. अशा प्रकारची शस्त्रक्रिया आतापर्यंत अनेक गुरांवर यशस्वीपणे केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गोशाळेचे अध्यक्ष हनुमंत परब यांनी सांगितले की, सानिया व तानिया यांनी निस्वार्थी भावनेतून ही व्यवस्था करण्याचे निश्चित केले आहे. त्यां निस्सीम गोभक्त आहेत, असे परब यांनी सांगितले.