प्रतिनिधी / बेंगळूर
मागील आठवडय़ात शपथबद्ध झालेल्या सात नूतन मंत्र्यांना गुरुवारी सकाळी खातेवाटप करण्यात आले होते. मात्र, खातेवाटपाविषयी नाराजी उफाळून आल्याने मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा सहा मंत्र्यांना खातेबदल करून दिले आहे. त्यापैकी दोघांना अतिरिक्त खात्यांचा पदभार देण्यात आला आहे. याद्वारे त्यांनी मंत्र्यांमधील नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.
मंत्री एम. टी. बी. नागराज, के. गोपालय्या, आर. शंकर आणि के. सी. नारायणगौडा यांनी आपल्याला वाटप करण्यात आलेल्या खात्यांबद्दल उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना अखेर नरमाईची भूमिका घ्यावी लागली आहे.
कोणत्याही कारणास्तव आपल्याला अबकारी खाते नकोच, अशी भूमिका घेतलेल्या एम. टी. बी. नागराज यांना नगरप्रशासन आणि साखर खाते देण्यात आले आहे. तर गोपालय्या यांना अबकारी खाते देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे आर. शंकर यांना बागायत आणि रेशीम खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. के. सी. नारायण गौडा यांना नियोजन, कार्यक्रम देखरेख आणि सांख्यिकी खात्याची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. गुरुवारी त्यांना क्रीडा आणि युवजन सेवा खाते देण्यात आले होते.
गुरुवारी खातेवाटपावेळी आर. शंकर यांना नगरप्रशासन खाते देण्यात आले होते. शुक्रवारी हे खाते काढून घेऊन एम. टी. बी. नागराज यांना देण्यात आले आहे. तर नागराज यांच्याजवळील अबकारी खाते के. गोपालय्या यांना दिले आहे. त्यांच्याजवळील रेशीम आणि बागायत खाते आर. शंकर यांना देण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे जे. सी. माधुस्वामी यांना हज आणि वक्फ खात्याचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. त्यांना गुरुवारी वैद्यकीय शिक्षण खात्याची जबाबदारी देण्यात आली होती.
लिंबावळींना आणखी एक खाते
मंत्री अरविंद लिंबावळी यांना वन खात्याबरोबरच कन्नड आणि सांस्कृतिक खात्याची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. खातेवाटपानंतर जे. सी. माधुस्वामी, डॉ. पे. सुधाकर, एम. टी. बी. नागराज आणि के. गोपालय्या गुरुवारच्या मंत्रिमंडळ बैठकीला अनुपस्थित राहिले होते. असंतुष्ट मंत्र्यांची समजूत काढण्यासाठी गृहमंत्री बसवराज बोम्माई, मंत्री आर. अशोक यांनी गुरुवारी दिवसभर चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी देखील असंतुष्टांशी चर्चा केली. मात्र, त्यांना यश आले नाही. त्यामुळे येडियुराप्पा यांनी शुक्रवारी पुन्हा सहा जणांना खातेबदल करून दिले आहे.
मंत्र्यांना मिळालेली खाती…
- एम. टी. बी. नागराज : नगरप्रशासन, साखर
- के. गोपालय्या : अबकारी
- आर. शंकर : बागायत आणि रेशीम
- के. सी. नारायण गौडा : नियोजन आणि सांख्यिका
- क्रीडा आणि युवजन सेवा खाते
- जे. सी. माधुस्वामी : हज आणि वक्फ, वैद्यकीय शिक्षण
- अरविंद लिंबावळी : कन्नड आणि सांस्कृतिक, वन