नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारच्या मंत्रिमंडळातील नवीन सदस्यांचा शपथविधी होत आहे. या मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्यांच्या यादीत पहिला मान हा महाराष्ट्राला नारायण राणे यांच्या रुपाने मिळाला. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर पहिलीच शपथ नारायण राणे यांनी घेतली असून त्यांनी हिंदी भाषेतून शपथ घेतली आहे. नारायण राणे यांच्यानंतर सर्बानंद सोनोवाल, डॉ. विरेंद्र कुमार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
काँग्रेसमधून बाहेर पडून भाजपामध्ये दाखल झालेल्या ज्योतिरादित्य सिंदिया यांचाही मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. ज्योतिरादित्य सिंदिया यांनी देखील हिंदीतून शपथ घेतली.
गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराला आज अखेर मुहूर्त मिळाला असून एकूण १२ विद्यमान मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यासोबतच एकूण ४३ मंत्र्यांचा आज शपथविधी केला जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ४ खासदारांचा समावेश आहे. त्यात नारायण राणे, भारती पवार, कपिल पाटील आणि भागवत कराड यांचा समावेश आहे. दुसरीकडे केंद्रातील विद्यमान मंत्र्यांपैकी आरोग्यमंत्री हर्ष वर्धन, प्रकाश जावडेकर, रवीशंकर प्रसाद यांनी देखील राजीनामे दिले आहेत. राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडत आहे.