वारणानगर / प्रतिनिधी
खेळता खेळता नात विहिरीत पडल्याचे पाहून तिला वाचवण्यासाठी गेलेल्या आजोबांचा हृदयविकाराच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाला. पन्हाळा तालुक्यातील नावली येथील रवींद्र रंगराव काळे हे टेलर म्हणून ते परिसरात परिचीत होते. या वेळी पाण्यातच त्यांना हृदयविकाराचा धक्का आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची चर्चा परिसरात आहे.
या घटनेने नावली परिसरात शोककळा पसरली आहे.
घटना स्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, रवींद्र काळे त्यांची पत्नी व नात असे तिघेजण शेतातील विहिरीवर कपडे धुण्यासाठी गेले होते. पत्नी कपडे धुण्यात मग्न असताना अचानक नात पाण्यात पडली. डोळ्यासमोर चिमुकली नात पाण्यात बुडतेली पाहून रवींद्र यांनी विहिरीत उडी घेतली. नातिला सुखरूप पाण्याबाहेर काढले. मात्र दम लागून हृदयविकाराने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेने नात आणि आजी बिथरुन गेल्या. त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. त्यांचा आवाज ऐकून आजूबाजूच्या लोकांनी विहिरीकडे धाव घेतली. लोकांनी त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. विहिरीत पडलेल्या नातिला वाचविण्यासाठी गेलेल्या आजोबांचा अशाप्रकारे दुर्देवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.