प्रतिनिधी /मडगाव
नावेली ग्रामपंचायतीच्या काल रविवारी झालेल्या ग्रामसभेत भूमिपुत्र विधेयकाला विरोध करणारा ठराव घेण्यात आला. त्याच बरोबर सरकारने घाई गडबडीत एकूण 21 विधेयके संमत केल्याने सरकारचा निषेध करण्यात आला. भूमिपुत्र विधेयक विधानसभेत मांडले जात असताना स्थानिक आमदार लुईझिन फालेरो यांनी कामकाजावर बहिष्कार घातल्याने त्यांच्या कृतीचा देखील निषेध करण्यात आला.
पश्चिम बगल रस्त्यावर पुल उभारण्यात यावा अशी मागणी देखील ग्रामस्थांनी ग्रामसभेत केली. या ग्रामसभेला स्थानिक आमदार लुईझिन फालेरो तसेच जिल्हा पंचायत सदस्य सिप्रु कार्दोज हे उपस्थित होते. सरपंच बिविंदा गोन्साल्वीस यांच्या अध्यक्षतेखाली ही ग्रामसभा झाली. ग्रामसभेची माहिती देताना सरपंच बिविंदा गोन्साल्वीस म्हणाल्या की, भूमिपुत्र विधेयकाला विरोध करण्याचा प्रस्ताव ग्रामसभेसमोर आला होता. त्यावर चर्चा करून भूमिपुत्र विधेयकला विरोध करणारा ठराव पंचायत मंडळाने घेतला आहे. पश्चिम बगल रस्त्यावर पूल उभारण्याची मागणी देखील ग्रामसभेत करण्यात आली. हा रस्ता सद्या अपघाताला आमंत्रण देत असल्याने लवकर पूल होणे स्थानिक लोकांच्या हिताचे असल्याचे सरपंचांनी सांगितले.