लाडक्या लेकीसाठी एका बापाने चक्क मोबाईलची वरात काढली आहे. ही घटना आहे मध्यप्रदेशच्या शिवपुरीतील. येथील एका चहावाल्याने 12 हजार 500 रुपयांचा एक मोबाईल फोन खरेदी केला आणि तो घरापर्यंत आणण्यासाठी आणखी 15 हजार रुपये खर्च केले. मोबाईल घरी आणण्यासाठी त्याने भाडय़ाने एक सजवलेली बग्गी घेतली तसेच डीजेचीही व्यवस्था केली. हे सर्व त्याने आपल्या 8 वर्षे वयाच्या कन्येसाठी केल्याचे दिसून आले आहे.
या पित्याचे नाव आहे मुरारीलाल कुशवाह. त्याला दारु पिण्याचे व्यसन लागले होते. त्याच्या उत्पन्नाचे बरेचसे पैसे दारुतच खर्च होत असत. कुशवाह यांची चहाची गाडी आहे. उत्पन्न बेताचेच, त्यात दारुचे व्यसन. त्यांची कन्या प्रियांका हिने काही महिन्यांपूर्वी मोबाईलची मागणी केली. तथापि, त्यांनी पैशाच्या कमतरतेचे कारण दाखवून मोबाईल घेण्यास नकार दिला. यावर त्यांच्या या 8 वर्षांच्या कन्येने त्यांना धाडसाने दारु पिणे सोडण्याचा, किमानपक्षी पिणे कमी करण्याचा सल्ला दिला. तिच्या या मागणीचा परिणाम कुशवाह यांच्यावर इतका खोलवर झाला की, त्यांनी दारु सोडण्याचा निश्चय केला आणि कृतीतही आणला. त्यामुळे त्यांचे पैसे वाचले आणि ते मुलीसाठी मोबाईल घेऊ शकते. मुलीमुळे आपले दारुचे व्यवस सुटले याचा त्यांना इतका आनंद झाला की, त्यांनी ज्या कारणास्तव हे व्यसन सुटले, त्या मोबाईलचीच वरात काढण्याचे ठरविले. त्याप्रमाणे बँडबाजा आणि डीजेच्या साथीने मोबाईलची वरात काढून त्याला घरी आणण्यात आले.
कुशवाह यांना या कन्येसह राम आणि श्याम या नावांचे दोन पुत्रही आहेत. त्यांनीही मोबाईलची मागणी केली होती. अशा प्रकारे हा मोबाईल, त्यांचे दारुचे व्यवस सुटण्यासाठी त्यांच्या मुलांच्या माध्यमातून कारणीभूत ठरला आहे. म्हणून त्यांना या मोबाईलचे आणि अर्थातच आपल्या मुलांचेही मोठे कौतुक वाटत आहे.