ग्राम पंचायतीसाठी सत्तेची इर्षा : 30 रोजी निपाणीत होणार मतमोजणी
वार्ताहर/ निपाणी
ग्रामपंचायतीचे सत्ता केंद्र काबीज करण्यासाठी उडालेला धुरळा रविवारी सायंकाळी थांबला. तालुक्यातील 27 ग्रामपंचायतींसाठी सर्वत्रच चुरशीने किरकोळ वादावादी वगळता शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. तालुक्यात 85 टक्के मतदान झाले.
रविवारी सकाळी 7 वाजल्यापासून मतदान केंद्रांबाहेर मतदानासाठी महिला व पुरुष मतदारांनी रांगा लावल्या होत्या. प्रशासनाने मतदान केंद्र व परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवला होता. कोरोना प्रतिबंधासाठी सामाजिक अंतर राखणे, मास्क वापराची सक्ती, सॅनिटायझरचा वापर अशा नियमांचा अवलंब करण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला. पण उमेदवार, नेते व मतदारांच्या उत्साहापुढे या सर्व नियमांची पायमल्ली झाल्याचे दिसून आले.
सकाळच्या टप्प्यात गतीने मतदान झाले. यामुळे मतदान केंद्रे गर्दीने फुलून गेली होती. मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी वाहनांची सोय उमेदवारांनी केली होती. अनेक ठिकाणी तर जेवणावळी व नाष्टय़ाची सोयदेखील करण्यात आली होती. मतदारांना पैशांचे आमिष दाखवून अनेक ठिकाणी मते विकत घेण्याचा दुर्दैवी प्रकार घडला. दुपारच्या टप्प्यात काही मतदान केंद्रे मतदारांविना ओस पडली होती. काही ठिकाणी तुरळक मतदार दिसत होते. यामुळे मतदानाचा टक्का घसरण्याची चिंताही व्यक्त होत होती. पण सायंकाळी पुन्हा मतदारांनी मतदान केंद्राबाहेर रांगा लावताना गर्दी केली. सायंकाळी 5 नंतरही अनेक ठिकाणी रांगा दिसून येत होत्या. यातूनच उच्चांकी मतदानाची नोंद ग्राम पंचायत निवडणुकीच्या माध्यमातून झाली.
निपाणी तालुक्याची कार्यवाही झाल्यानंतर प्रथमच झालेल्या या सार्वत्रिक निवडणुकीची कार्यवाही निपाणीतून झाली. आता मतमोजणीही निपाणीतच होणार असून याचे नियोजन केएलई संस्थेच्या जी. आय. बागेवाडी महाविद्यालयात तालुका प्रशासनाने केली आहे. 30 रोजी मतमोजणी होणार असून यानंतर निकालाची घोषणा होऊन विजयी सदस्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येणार आहे.
ग्रा. पं. निहाय झालेले मतदान
निपाणी तालुक्यात 27 ग्रा. पं. मध्ये सरासरी 85 टक्के मतदानाची नोंद झाली. बेनाडी-82, अकोळ-78, आडी-86.39, कोगनोळी-85, ममदापूर के. एल.-92, जत्राट-89.57, सौंदलगा-92, कुन्नूर-91, आप्पाचीवाडी-90, मांगुर-92.16, गळतगा-80.34, यरनाळ-86, बेडकिहाळ-79, कोडणी-85, यमगर्णी-85.95, माणकापूर-85, ढोणेवाडी-90.78, सिदनाळ-90.91, चाँद शिरदवाड-88.79, हुन्नरगी-84, कुर्ली-80, लखनापूर-81, शेंडूर-88.67, कारदगा-87, भोज-85, बारवाड-89, शिरगुप्पी-88 टक्के मतदान झाले.